गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी मुंबईतील बाजारांत झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी (ता. 5) दादर, लालबाग, गिरगाव परिसरात बाजार नागरिकांनी फुलून गेले होते. कपडे, दागिन्यांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी झाली होती. दादर फुलबाजारात तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. 

मुंबई - गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी (ता. 5) दादर, लालबाग, गिरगाव परिसरात बाजार नागरिकांनी फुलून गेले होते. कपडे, दागिन्यांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी झाली होती. दादर फुलबाजारात तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. 

गुढीपाडव्याला पारंपरिक वेशभूषा करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मोत्याचे झुमके, तोडे, ठुशी, चिंचपेटी, तन्मणी, शाही हार, बोरमाळ आदी इमिटेशन दागिने घेण्यासाठी कीर्तिकर मार्केटमध्ये महिलांची झुंबड उडाली होती. "रेडिमेड' नऊवारी साड्यांना तरुणींची विशेष पसंती असल्याचे सांगण्यात आले. भुलेश्‍वर मार्केटमध्ये तयार फेट्यांना मोठी मागणी होती. 

फुलबाजार फुलला 
दादरच्या फुलबाजारात मोठी गर्दी उसळली होती. तेथील पादचारी पुलाच्या उताराचे काम सुरू असल्यामुळे वाट काढणे कठीण झाले होते. गुढीपाडव्यामुळे फुलांचे भाव चांगलेच वधारले होते. झेंडू 80 ते 100 रुपये, गुलछडी 260 रुपये, मोगरा 400 रुपये, शेवंती 80 रुपये (किलो), तर आंब्याची डहाळी 10-20 रुपये, तोरण 50 ते 60 रुपये, हार 30 ते 100 रुपये, शेवंती 80 रुपये असे भाव होते. 

सराफी पेढ्यांना झळाळी 
गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनेखरेदी केली जाते. दादर भागातील वामन हरी पेठे, जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स, पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स आणि इतर पेढ्यांवर नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक जण नवे काय आले, अशी विचारणा करताना दिसले. काही जणांनी दागिने "बुक' करून जाणे पसंत केले. 

Web Title: Shopping for Gudi Padwa in the market in Mumbai