कल्याणमध्ये पुलांची कामे झाल्यावरच सिग्नल यंत्रणा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

कल्याणच्या प्रवेशद्वारावरील पत्री पूल, दुर्गाडी पूल आणि पौर्णिमा चौक परिसरातील पूल यांची कामे रखडल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. पुलांची कामे पूर्ण होईपर्यंत त्या भागांत सिग्नल बसवू नका, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी "स्मार्ट सिटी'च्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

कल्याण : कल्याणच्या प्रवेशद्वारावरील पत्री पूल, दुर्गाडी पूल आणि पौर्णिमा चौक परिसरातील पूल यांची कामे रखडल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. पुलांची कामे पूर्ण होईपर्यंत त्या भागांत सिग्नल बसवू नका, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी "स्मार्ट सिटी'च्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

"स्मार्ट सिटी' योजनेंतर्गत कल्याण शहरातील प्रमुख चौकांत सिग्नल यंत्रणा आणि सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, हे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. संबंधित कंपनीने सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या जागांचा आराखडा तयार केला आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिस आणि वाहतूक पोलिसांसह सर्वेक्षण केले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम आराखडा बनवला जाईल आणि नवीन वर्षात टप्प्याटप्याने सिग्नल आणि सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. यासंदर्भात सोमवारी (ता. 2) वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय निघोट, वरिष्ठ निरीक्षक सुखदेव पाटील आणि "स्मार्ट सिटी' विभाग अधिकाऱ्यांनी कल्याणमधील वेगवेगळ्या विभागांत पाहणी केली. 

कल्याण शहरातील एकही रस्ता वाहतुकीच्या नियमानुसार नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी पदपथांवर अतिक्रमणे झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. कल्याण शहरात प्रवेश करण्याच्या रस्त्यांवरील पत्री पूल, दुर्गाडी पूल, शहाडजवळील वालधुनी पूल यांची कामे रखडली आहेत. सुभाष चौकाजवळील वालधुनी पुलास पर्यायी पूल बांधणे, गोविंदवाडीवरून जाणाऱ्या रस्त्यावर नवा पूल बांधणे, पथदिवे स्थलांतरित करणे ही कामे अगोदर पूर्ण करा. त्यानंतरच या भागांत सिग्नल यंत्रणा बसवा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी "स्मार्ट सिटी' विभागाला दिल्या आहेत. 

कोंडी फुटणार 
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी "स्मार्ट सिटी' विभागाने कंबर कसली आहे. पुढील 10 महिन्यांत ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. 

"स्मार्ट सिटी' विभागासोबत सुरू असलेले सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आले आहे. रस्ते आणि पुलांची कामे पूर्ण झाल्यानंतरच सिग्नल यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- सुखदेव पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Signal mechanism only when bridges work in Kalyan