मुंबईत सीएनजी वाहने घेणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ; लवकरच शहरातील सीएनजीधारकांची संख्या 'इतकी' होणार

मुंबईत सीएनजी वाहने घेणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ; लवकरच शहरातील सीएनजीधारकांची संख्या 'इतकी' होणार

मुंबई ः प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल, पेट्रोलऐवजी सीएनजी वाहनांनी पसंती देण्याची सूचना केली जात असते. आता मुंबईत सीएनजी वाहने घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांपैकी वीस टक्के सीएनजीवरील असतील. 

मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची 2018-19 मध्ये 6 लाख 89 हजार वाहनांची नोंद झाली होती, तर त्यात 2019-20 मध्ये वाढ होऊन ती संख्या 7 लाख 52 हजारांवर गेली, असे वृत्त आहे. एका वर्षात मुंबईत नोंद झालेली सीएनजी वाहने 62 हजारांनी म्हणजे 9 टक्क्यांनी वाढली.  सीएनजीवरील वाहनांना मिळणारी पसंती सातत्याने वाढत आहे. 2016-17 च्या तुलनेत 2019-20 मधील सीएनजी वाहनांची खरेदी 2 लाख 10 हजारांनी वाढली आहे. या चार वर्षात अर्थव्यवस्थेला फारसा वेग आला नाही, पण त्यानंतरही पर्यावरणासाठी अनुकुल असलेल्या वाहनांच्या खरेदीतील वाढ लक्षणीय आहे. 
हरीत इंधन वापरत असलेल्या खाजगी वाहनात सातत्याने वाढ होत आहे. कारमध्ये एका वर्षात 23 हजारांनी वाढ झाली, त्यामुळे मुंबई महानगरातील सीएनजी कार आता एकंदर सव्वातीन लाखावर गेल्या आहेत. त्याचवेळी सीएनजीवर चालणाऱ्या नव्या 34 ऑटोरिक्षा रस्त्यावर आल्या, मात्र टॅक्सीतील वाढ केवळ एक हजाराचीच आहे. 

सीएनजीवर चालणाऱ्या आता मुंबई महानगर क्षेत्रात एकंदर साडेतीन लाख रिक्षा आहेत, तर टॅक्सी आता 66 हजार झाल्या आहेत. त्याचवेळी बस आणि ट्रकची संख्या पाच हजाराच्या आसपास आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे. त्याचबरोबर पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या तुलनेत सीएनजीवरील कारचे माईलेज 60 ते 70 टक्के जास्त असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

-------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com