
Mumbai : शिवसेना भवनात शांतता
मुंबई - निवडणूक आयोगाने पक्ष आणि धनुष्य बाण एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात काहीसं चिंतेच वातावरण पसरलं होत मात्र सामान्य कार्यकर्त्यांचा जोश अजूनही कायम असल्याचं चित्र आहे. आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवनात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाचे शांतपणे नियोजन सुरु होते.
शुक्रवारी रात्री निर्णय आल्यानंतर शिवसेना भवनात थोडी चलबिचल जाणवत होती,मात्र दिवस उजाडताचं परिस्थिती सामान्य झाली. शनिवारी दुपारी शिवसेना भवनाचा फेरफटका मारल्यावर पदाधिकारी आश्वस्त असल्याचे दिसले.
या निर्णयाचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना बसेल अशी बाहेर सर्वत्र दुरचित्रवाहीन्यांवर जोरदार चर्चा सुरु असताना, मुख्यालयात मात्र शांततेत काम सुरु होते. सध्या संघटनेचा सर्व फोकस मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमावर आहे.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने २७ फेब्रुवारीला मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. शिवसेना भवनात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे.
लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी इतर चर्चा सोडून नियोजन आखण्याचे काम सुरु होते. उद्धव ठाकरे या कार्यक्रमातून पुढील राजकीय वाटचालीवर भाष्य करणार असल्यामुळे या कार्यक्रमाचे सखोल नियोजन सुरु आहे. काही पदाधिकाऱ्याना सेनेच्या भविष्यावर विचारल्यावर त्यांनी जे व्हायचे होते ते झाले, आता होऊन जाऊदे, चिंता नाही असं बिनधास्त उत्तर दिले.
महाशिवरात्र असल्यामुळे मुख्यालयात फारशी वर्दळ नव्हती. शिवसेना भवनाच्या आजूबाजूला पोलिस सुरक्षा वाढवल्याचे दिसत होते. शिवसेना भवनाशेजारी राहणाऱ्या सामान्य लोकांशी चर्चा केल्यावर आयोगाचा निर्णय धक्कादायक आहे.
मात्र सुप्रीम कोर्टाचा निकाल अजूनही आपल्या बाजूला येईल अशी आशा सामान्य शिवसैनिक व्यक्त करत होते. शिवसेनेच्या मुंबईत पसरलेल्या शाखा एकनाथ शिंदे ताब्यात घेतील याची भिती सामान्य शिवसैनिकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली,
मात्र बहुतांश शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टचे आहे. त्यामुळे शिवसेना भवन ताब्यात घेऊ शकत नाही याबद्दल आश्वस्त होते.
आयोगाच्या निर्णयानंतर सेना भवनाच्या आजूबाजूचे लोक अलर्टवर होते. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इकडे येतील या भितीने रात्री अनेक कार्यकर्ते शिवसेना भवनाच्या बाहेर जमले होते. मात्र महाशिवरात्र असल्यामुळे सेना भवनात गर्दी सामान्य होती.