जितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते' हा उपक्रम नुकताच पूर्ण केला. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी भुरूक यांचे कौतुक केले.

मुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते' हा उपक्रम नुकताच पूर्ण केला. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी भुरूक यांचे कौतुक केले.

किशोर कुमार गीत गायक अशी ओळख निर्माण झालेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक हे संगीत क्षेत्रात गेल्या 25 वर्षांपासून योगदान देत आहेत. भुरूक यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून 89 गाणी गायली. या कार्यक्रमाचे आयोजन स्वप्नील पंडित यांनी तर प्रस्तुती 'मेघमल्हार' या संस्थेची होती. कार्यक्रमावेळी प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी स्टेजवरच आपल्या कुंचल्यातुन किशोरकुमार यांचे हुबेहूब चित्र साकारले. अभिनेते जितेंद्र यांच्यावर चित्रित झालेली ओ मांझी रे, अब के सावन मे, मुसाफिर हुं यारो, नयनो में सपना... आदी गीते भुरूक यांनी गायली.

अभिनेते जितेंद्र म्हणाले, मला खरे तर गायक व्हायचे होते पण अभिनेता झालो. जितेंद्र भुरूक हे 'गायनातला शेर' आहे. इस शेर के लिये मै लोनावला से मुंबई ये सफर जाम में ४ घंटे काटकर आया हुं' असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्यांच्या रसिकतेला दाद दिली.

भूरूक म्हणाले, 'भोपाळ येथे मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमात सलग पाच तासात जवळपास 58 गाणी गाऊन मुंबईत दाखल झालो. चाहत्यांच्या प्रेमामुळेच संगीत क्षेत्रात स्थिर आहे. 2009 मध्ये किशोर कुमारजींची 80 गीते गायली होती. कारगिलमध्ये जाऊन कार्यक्रम सादर करण्याचा मान मिळाला. सलग 2 वर्षे किशोरदांच्या मध्य प्रदेशातील खांडवा या जन्मगावी कार्यक्रम सादर करण्याचे भाग्य लाभले. विविध उपक्रमांद्वारे समाज ऋणांतून मुक्त होण्याच्या प्रयत्न करत आहे.'

आयोजक स्वप्नील पंडित यांनी तबला वादन केले. सहगायक व सहगायिका म्हणून अमृता, वीणा, दीप्ती व गफार मोमीन यांनी साथ दिली तर निवेदन विनीत देव यांनी केले.

Web Title: singer Jitendra Bhuruk continue singing kishor kumars 81 songs