शीव रुग्णालयातील मृतदेह अदलाबदल प्रकरण: किडनी काढल्याचा आरोप अयोग्य, पालिकेचं स्पष्टीकरण

भाग्यश्री भुवड
Monday, 14 September 2020

शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील 2 कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मुंबई:  शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील 2 कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करत नसून या दुर्देवी प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मृत व्यक्तिचे शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याच्या आरोप सर्वस्वी चुकीचा असून प्रशासन तो स्पष्टपणे नाकारत आहे. 

शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय 26) यांना 28 ऑगस्टला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. एका अपघातात जबर जखमी झाल्यानं उपचारार्थ आलेल्या अंकुश सुरवडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीसह उपचार पुरवण्यात येते होते. दुर्देवाने अंकुश यांचे काल 13 सप्टेंबर सकाळी निधन झाले. विहित प्रक्रियेनुसार त्यांचे शव इतर तपासणीसाठी नेण्यात आले.

दरम्यान, शीव रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवार, 12 सप्टेंबर 2020 ला मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते. अंकुश आणि हेमंत या दोन्ही रुग्णांच्या शवांची उत्तरीय तपासणी काल (13 सप्टेंबर 2020) सकाळी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही शव रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. 

 

अंकुश सुरवडे यांच्या नातेवाईकांनी काल सकाळीच रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून कळवले की, दुपारी 4 वाजेच्या सुमारास येऊन ते अंकुश यांचा शव ताब्यात घेतील. दरम्यानच्या कालावधीत, हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे ओळखून, सर्व प्रक्रिया पार पाडून, पोलिसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुश यांचे शव हे हेमंत यांचे शव असल्याचे समजून सोपवण्यात आले. हेमंत यांच्या नातेवाईकांनी शव ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधी देखील पार पाडले. त्यानंतर, अंकुश यांचे नातेवाईक रुग्णालयात आले आणि त्यांनी शव ताब्यात देण्याची विनंती केल्यानंतर ही चूक घडल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे अंकुश यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. पोलिस प्रशासनही रुग्णालयात आले. घडल्या चुकीमुळे एकंदर परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले.
    
या घटनेतील चुकीबद्दल, शवागारातील संबंधित दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल. तथापि, शवविच्छेदन करताना मृताचे मूत्रपिंड (किडनी) करण्यात आल्याचा आरोप मात्र अयोग्य असून हा आरोप प्रशासन नाकारत आहे.

नेमके काय घडले?

अंकुश सुरवाडे (वय 27) या तरुणाचा 28 ऑगस्ट रोजी मुक्त द्रुतगती मार्ग येथे अपघात झाला. ज्यानंतर अंकुशला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे 14 दिवस उपचार केल्यानंतरही त्याचा 13 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजता मृत्यू झाला. अंकुशच्या मृत्यु झाल्याचे कळताच नातेवाईक आणि मित्र मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली, दरम्यान अतिदक्षता विभागात मृतदेह बघण्यासाठी गेलेले नातेवाईक आणि मित्राच्या लक्षात आले की, अंकुशच्या किडनीजवळ शस्त्रक्रिया करून त्या ठिकाणी टाके मारण्यात आले होते. 

ही बाब रुग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर नातेवाईकानी संबंधित डॉक्टरांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप अंकुशच्या नातेवाईक आणि मित्रमंडळी केला आहे. अंकुशचा मृतदेह रुग्णालयातील शवागृहात पाठवण्यात आला होता, दोन तासापूर्वी आम्ही मृतदेह बघून आलो होतो, दोन तासानी अंकुशचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता अंकुशचा मृतदेह चुकून दुसऱ्याला दिला गेला, व त्या मृदेहावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले असल्याचे शवगृहातून सांगण्यात आले असल्याचा आरोप मृत अंकुशच्या नातेवाईकांनी केला. 

यानंतर सायन रुग्णालयाकडून एक पत्रक काढण्यात आलं ज्यामध्ये त्यांनी मृतदेह अदलाबदल झाल्याची चूक मान्य केली असून याला जबाबदार असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करुन पुढील चौकशी सुरु केल्याचे सांगितलं.

--------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Sion hospital Family Handed Wrong Body BMC suspended Two staff


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sion hospital Family Handed Wrong Body BMC suspended Two staff