सायन-पनवेल  होणार खड्डेमुक्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

तुर्भे - पावसामुळे खराब झालेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जात आहेत. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा मिळणार असून, येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍नही सुटण्यास मदत होणार आहे.

तुर्भे - पावसामुळे खराब झालेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जात आहेत. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा मिळणार असून, येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍नही सुटण्यास मदत होणार आहे.

सायन-पनवेल महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात आणि पाच लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. या महामार्गावर सानपाडा, नेरूळ, उरण फाटा, कामोठे आणि खारघर अशा पाच ठिकाणी उड्डाणपूल आहेत. गेल्या वर्षी पहिल्या पावसातच या उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक अपघात झाले होते. या वेळीही पहिल्याच पावसात महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल घेऊन त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यात तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याजवळचे खड्डे खडी व विशिष्ट मटेरियल टाकून बुजवले जात आहेत. पावसाळ्यात महामार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. ते टाळण्यासाठी आणि आता पावसाने उघडीप दिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले आहे. काही दिवसांपासून तुर्भे पोलिस ठाण्यासमोर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे. तुर्भे ते जुईनगर दरम्यानचा रस्ता अतिशय खराब झाल्याने त्याचा त्रास वाहनचालक आणि प्रवाशांना होत आहे. 

गेल्या आठवड्यात काही दिवस पडलेल्या पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे; परंतु आता सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. 

सध्या पावसाळा सुरू असल्याने या मार्गावरील खड्डे खडी व डांबराला पर्याय असलेले विशिष्ट मटेरियल टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याची कामे सुरू आहेत. पावसामुळे डांबरीकरण करता येत नाही; मात्र पाऊस उघडल्यानंतर डांबरीकरण करून हा महामार्ग खड्डेमुक्त केला जाईल.
- विशाल जगधाने,  अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Sion-Panvel will be free Potholes free