''समुद्रातल्या घुसखोरीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज''

अच्युत पाटील
गुरुवार, 22 मार्च 2018

बोर्डी : 'माझा राजीनामाच हवा असेल, तर आजच्या आज देतो.. पण समुद्रात चाललेली घुसखोरी आणि अतिक्रमणाचा प्रश्‍न नवीन नाही. शासनानेही यात गांभीर्याने लक्ष घालण्याची वेळ आली आहे. म्हणून सातपाटी ते दमणपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावरील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या संतप्त भावनांचा उद्रेक टाळण्यासाठी मच्छीमारांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे', असे महाराष्ट्र राज्य मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलॅंसो यांनी स्पष्ट केले. 

वसईच्या मच्छीमारांकडून झाईच्या समुद्रात वारंवार घुसखोरी करून मासेमारी केली जात असल्याने स्थानिक मच्छीमार भरडला जातो. याविषयी चर्चेतून तोडगा काढण्यासाठी झाई मांगेला व माच्छी मच्छीमार सेवा सहकारी संस्थेने आयोजित केलेल्या प्रतिनिधींच्या बैठकीत कोलॅंसो बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिशरमन फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ठाणे जिल्हा मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्ष ज्योती मेहेर, अशोक अंभिरे, नारायण विंदे, राजन मेहेर, रामकृष्ण तांडेल, दमणचे हितेशभाई तांडेल तसेच सातपाट ते दमणपर्यंतच्या विविध मच्छीमार सोसायटीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

वसई भागातील मच्छीमारांच्या घुसखोरीने ग्रासल्याने स्थानिक मच्छीमारांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. गावातील शंभर टक्के महिलांचे दागिने बॅंकेत गहाण पडले आहेत. उत्पन्नाची बाजू कमकुवत झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पैसेही नसल्याने शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वसईच्या मच्छीमारांनी घुसखोरी केल्यामुळे तरुण मच्छीमार आणि महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हा उद्रेक टाळण्यासाठी झाई गावाने पुढाकार घेऊन आज (गुरुवार) सभा बोलाविली होती. 

'घुसखोरी थांबवा अन्यथा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही' असा इशारा झाईचे मच्छीमार राजू मझवलेकर यांनी प्रास्ताविक भाषणात दिला. त्यानंतर सर्वच उपस्थितांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. 

2002 मध्ये वसईच्या मच्छीमारांनी सातपाटी भागात घुसखोरी सुरू केली. तेव्हापासून मोठा संघर्ष झाला होता. या प्रकरणात स्थानिक नेत्यांनी समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही तोडगा निघाला नाही. न्यायालयीन खटल्यांमध्ये वेळ आणि पैसा वाया जात आहे, असे मत संजय तरे यांनी व्यक्त केले. 

अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, 'समुद्रात ज्या काही घटना घडतात त्याला आपणही जबाबदार आहेत. आपण आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. शासनाने काही नियम करून पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना संरक्षण देण्यासाठी कठोर निर्णय घेतले पाहिजेत. मच्छीमारांनीदेखील सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. सर्व मच्छीमार आपले बांधव आहेत. उद्रेक होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात आठ दिवसात बैठक आयोजित करू.''

Web Title: situation tensed at Bordi due to clashes between fishermen