बोगस फार्मासिस्टप्रकरणी आणखी सहा जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

या सहाही जणांनी बारावीच्या बनावट प्रमाणपत्रांवर डॉ. ताहीलरामानी यींच्या संस्थेतून डी.फार्मसीची बोगस प्रमाणपत्रे मिळवून दुकाने थाटली होती. फसवणुकीप्रकरणी सहाही जणांना अटक करण्यात आली आहे. 

- नितीन ठाकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट, ठाणे 

ठाणे : ठाणे-मुंबईसह परराज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस फार्मासिष्ट प्रमाणपत्र घोटाळ्यात पुन्हा काही औषध दुकानदारांना पोलिसांनी अटक केली आहे. महिन्याभरापूर्वी ठाणे पोलिसांनी या टोळीचा छडा लावून सहा जणांना अटक केली होती. या बोगस प्रमाणपत्रांच्या रॅकेटमध्ये आता आणखी सहा आरोपींना सोमवारी (ता. 18) अटक करण्यात आल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या 12 झाली आहे. सोमवारी अटक केलेल्या या सर्व आरोपींना न्यायालयाने 26 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

महिनाभरापूर्वी तक्रारदार दीपांकर घोष यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बनावट फार्मासिष्ट आणि उत्तरप्रदेश, अजमेर आणि दिल्ली येथील शैक्षणिक संस्थांच्या नावाची 10 वी व 12 वीची बोगस प्रमाणपत्र बाळगून औषध दुकाने चालवणाऱ्यांचा भंडाफोड केला होता. ही बोगस प्रमाणपत्रे डॉ. पुरुषोत्तम ताहीलरामानी यांच्या ढोकाळी येथील दीप पॅरामेडिकल या ऑर्गनायझेशन संस्थेतून घेवून विविध राज्यांत औषध दुकानदारांना चालविण्यासाठी याचा वापर करण्यात येत होता. त्यानुसार गुन्हे शाखेने डॉ. ताहीलरमानी यांच्यासह सहा आरोपींना अटक करून कारागृहात डांबले होते.

या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनखाली सहा.पोलिस निरीक्षक संदीप बागुल करीत होते. अधिक तपासात आणखी सहा जणांच्या मुसक्‍या आवळण्यात पथकाला यश आले. 

या औषध दुकानांवर कारवाई 

यातील नरेंद्र गेहलोत (32) याचे दिघा येथील श्रीरामदेव मेडिकल, हरिशंकर जोशी (38) याचे ठाण्यातील लाइफकेअर फार्मा आणि मुंब्रा येथील मेडिकल स्टोअरचा समावेश आहे. दीपक विश्‍वकर्मा (30) याचे मुलुंड येथे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र, प्रेमचंद चौधरी (40) याचे भिवंडी, अंजूरफाटा येथे कैलास मेडिकल, प्रवीण गड्डा (50) याचे ठाण्यातील रावमराठा मेडिकल अँड जनरल स्टोअर आणि महेंद्र भानुशाली (30) याचे डोंबिवली येथील मेडिकल स्टोअर येथे कारवाई करण्यात आली.

Web Title: Six others arrested for bogus pharmacist case