मुंबई - वांद्रे पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षात एका व्यावसायिकाला सहा तास डांबून दुसऱ्या व्यावसायिकासाठी सात लाख रोख व पाच-पाच लाखांचे दोन धनादेश घेतल्याच्या आरोपाखाली सहायक पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक गजानन चोरमले (सध्या कफ परेड पोलिस ठाणे), उपनिरीक्षक धनाजी साठे, हवालदार श्रीधर वाघमारे, पोलिस शिपाई कुंदन कदम, अनिल चौधरी व सिद्धेश टेमकर अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. गेल्या महिन्यात या सर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे.
वांद्रे पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वांद्य्रातील व्यावसायिक काशिद खान याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी झाले होते; पण त्याला याची माहिती नव्हती. पूर्वी दाखल केलेल्या एका तक्रारीची चौकशी करण्यासाठी तो वांद्रे पोलिस ठाण्यात गेला होता. त्या वेळी एका शिपायाने खानला पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना पाहिले. त्याने त्याला ताब्यात घेऊन गुन्हे प्रकटीकरण कक्षात नेले. त्याने तेथे कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक चोरमले यांना बोलावले. बिरेन सेलारका नावाच्या व्यावसायिकासोबत खानचा न्यायालयात दिवाणी वाद सुरू होता. त्या सेलारकाला घेऊन चोरमले पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्याच्या उपस्थितीत मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सहा तास पैशांच्या देवाणघेवाणीबाबत तडजोड घडवून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खानने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती.
|