कल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला; नागरिक हैराण

रविंद्र खरात 
सोमवार, 23 एप्रिल 2018

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका प्रवाशांचा जीव गेला तरी सरकारी यंत्रणा यावर कुठलीही उपाययोजना करत नसल्याने नागरीकामध्ये संतापाचे वातावरण असून मोठी दुर्घटना घडल्यावर यंत्रणा जागी होणार का? असा सवाल केला जात आहे.

कल्याण - कल्याण पूर्व मधील रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या दुसऱ्या टप्यातील सिद्धार्थ नगर ते गणपती चौकातील स्कायवॉकचे काम रखंडल्याने नागरीकांना अनेक अडथळे पार करत रेल्वे स्थानक गाठावे लागत असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका प्रवाशांचा जीव गेला तरी सरकारी यंत्रणा यावर कुठलीही उपाययोजना करत नसल्याने नागरीकामध्ये संतापाचे वातावरण असून मोठी दुर्घटना घडल्यावर यंत्रणा जागी होणार का? असा सवाल केला जात आहे.

कल्याण पूर्व मधील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठताना सिद्धार्थ नगर येथील कारशेड मधील रेल्वे मार्ग ओलांडून पुढे अंधारमय बोगदे पार करून जावे लागत होते. यावर उपाय म्हणून कल्याण डोंबिवली महानगर पालिका, एम. एम. आर. डी. आणि रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्व रेल्वे स्थानक ते सिद्धार्थ नगर आणि सिद्धार्थ नगर ते गणपती चौक आणि तिकीट घर ते कल्याण रेल्वे स्थानक मधील मोठा पादचारी पूल असा स्कायवॉक सुमारे 32 कोटी 81 लाख खर्च करून बांधण्यास सुरवात झाली. कल्याण पूर्व तिकीट घर ते कल्याण स्थानक मधील स्कायवॉक अंतिम टप्यात असून कल्याण पूर्व ते सिद्धार्थ नगर पूर्ण झाला असून सिद्धार्थ नगर ते गणपती चौक या परिसरातील स्कायवॉक अनेक महिन्यापासून रखडलेल्याने कल्याण पूर्व मधील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करत रेल्वे स्थानक गाठावे लागते. 

सिद्धार्थ नगर ते गणपती चौक रखडला स्कायवॉक...आणि जीव गेला...कल्याण रेल्वे स्थानक मधून कल्याण पूर्वेला जाताना सिद्धार्थ नगर ते गणपती चौक हा स्कायवॉक रखडल्याने नागरीकांना तिकीट घर पासून चालत दोन बोगदे मधून पायपीट करत रिक्षा स्थानक आणि मग घर गाठावे लागते. यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीचा प्रवास हा जीवघेणी झाला आहे. कल्याण पूर्व मधील राहणारे विनोद सुर्वे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामावरून घरी जात असताना चोरट्यांनी त्यावर प्राणघातक हल्ला केला त्यात त्याचा दुर्दवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पुन्हा स्कायवाक प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेथे सुरक्षा व्यवस्था वाढवा, स्कायवाक पूर्ण करा, सी सी टीव्ही कॅमेरा लावा या मागणीला जोर धरू लागला आहे. मात्र रेल्वे परवानग्या, एम एम आर डी कडून निधी उशिरा मिळणे यामुळे कल्याण पूर्व मधील स्कायवॉक रखडला असून नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून मोठी दुर्घटना घडल्यावर सरकारी यंत्रणा जागी होणार का असा सवाल केला जात आहे. 

तांत्रिक अडचणी, परवानग्या आणि निधी या सर्व गोष्टीमुळे कामाला उशीर होत असून मे महिन्याच्या अखेरीस कल्याण पूर्व मधील स्कायवाक नागरिकांना खुला करून दिला जाईल. 

तारीख पे तारीख केवळ पालिका प्रशासन जाहीर करत असून आता या स्कायवॉक रखडल्याने कल्याण पूर्व मधील नागरिकांचे जीव जाऊ लागले असून आता आम्ही 30 एप्रिलची डेडलाईन दिली असून त्यापूर्वी तो खुला न केल्यास मे महिन्यात आम्ही अर्धवट स्कायवाक वर आंदोलन करू अशी माहिती आम आदमी पार्टीचे पदाधिकारी रवी केदारे यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Skywalk work in Kalyan East stopped