कामचुकारपणा करणारे ‘...हे’ अधिकारी तडकाफडकी निलंबित!

कामचुकारपणा करणारे ‘...हे’ अधिकारी तडकाफडकी निलंबित!
कामचुकारपणा करणारे ‘...हे’ अधिकारी तडकाफडकी निलंबित!

नवी मुंबई : दैनंदिन कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना घरी जाण्यास भाग पडले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांवर पालिका प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. अभियांत्रिकी विभागातील पाणीपुरवठा विभागात काम करणारे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे, कनिष्ठ अभियंता सुजित पारवे आणि स्वच्छता निरीक्षक अरुण पाटील अशी तिघांची नावे आहेत. 

नगरविकास विभागाने आयोजित केलेल्या हैदाबाद येथील एका बैठकीला जाण्यासाठी महापालिकेतर्फे मनोहर सोनवणे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले होते. याबाबत शहर अभियंते सुरेंद्र पाटील यांनी त्यांना कल्पनाही दिली होती. तसेच वारंवार आठवणही करून दिली होती. मात्र, सोनावणे महापालिकेने सुचवलेल्या बैठकीला न जाता वैयक्तिक बैठकीला गेल्यामुळे जाऊ शकले नाहीत. सोनावणे यांना पूर्वसूचना देऊनही महापालिकेच्या बैठकीत गैरहजर राहिल्यामुळे सोनावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच नेरूळ विभागातील कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान नेरूळ एलपी उड्डाणपुलाखालील महापालिकेच्या स्वच्छतागृहात मिसाळ यांना अस्वस्छता व दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. त्याबाबत मिसाळ यांनी वरिष्ठांवर नाराजी व्यक्त करीत कामचुकारपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार घनकचरा विभागातील स्वच्छता निरीक्षक अरुण पाटील यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी प्रशासनाला दिलेले स्पष्टीकरण फारसे समाधान करणारे नसल्यामुळे त्यांना अखेर निलंबित करण्यात आले. याच प्रकरणात कंत्राटी पद्धतीवरील कनिष्ठ अभियंता सुजित पारवे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनातर्फे पुकारण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

स्वच्छता अभियानावर बहिष्कार
स्वच्छता निरीक्षक अरुण पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यामुळे आज दिवसभर पालिकेत चर्चेला उधाण आले होते. पाटील यांच्यावर केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनने घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या दालनाबाहेर घेराव घातला होता. स्वच्छता निरीक्षकांवर केलेली कारवाई अन्यायकारक असून, कारवाई मागे घेण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. कारवाई मागे न घेतल्यास स्वच्छता अभियानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com