प्रचारात ‘लक्ष द्या, मत द्या’चा नारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

प्रचारासाठी अवघे चार ते पाच दिवस शिल्लक असल्याने मतदारांपर्यंत नाव, निवडणूक चिन्ह पोहोचावे, यासाठी वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून दुपारच्या वेळीही घराची डोअरबेल वाजवत लक्ष द्या, मत द्या, अशी आर्त हाक दिली जाते.

नवी मुंबई : प्रचारासाठी अवघे चार ते पाच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांकडून घरोघरी भेटी देऊन प्रचार केला जात आहे. आतापर्यंत सकाळ व संध्याकाळ असे दोनदा भेटीचे वेळापत्रक साधारणत: अनेकांचे ठरले होते; मात्र आता या वेळापत्रकाला बगल देत दुपारीही अधिकाधिक भेटीगाठी तसेच मतदारांपर्यंत नाव, निवडणूक चिन्ह पोहोचावे, यासाठी वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून दुपारच्या वेळीही घराची डोअरबेल वाजवत लक्ष द्या, मत द्या, अशी आर्त हाक दिली जाते.

सध्या सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत प्रचार करण्याची परवानगी आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवार सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत घरोघरी भेट देतात. दुपारच्या वेळेत बैठक घेऊन नियोजन ठरवतात. सायंकाळी परत घरोघरी भेट देण्याचे नियोजन असते. या आठवड्यात सार्वजनिक सुट्टी नसतानादेखील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांच्या दुपारच्या वेळीही घराची डोअरबेल वाजवली जाते. लक्ष द्या, मत द्या, अशी आर्त हाक दिली जाऊ लागली आहे. ओळखीचे उमेदवार असले तर काही जण घरात बसून चर्चाही करतात. अपरिचित वा नवखे असले तर रामरामच्या पलीकडे होत नाही. केवळ आमच्या उमेदवारांकडेच जरा लक्ष द्या, अशीच विनंती करण्यात येते. या वेळी कार्यकर्त्यांकडून नागरिकांना प्रचार व वचननाम्याची छोटीशी पुस्तिका वाटण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये महिलाही मोठ्या हिरिरीने प्रचारात सामील झाल्या आहेत. उमेदवारांपेक्षा कार्यकर्तेच प्रचारावर अधिक भर देत आहेत. विशेष म्हणजे महिला वर्ग आपल्या घरातले योग्य नियोजन करून प्रचाराला वेळ देत आहेत.

ध्वनिफितींद्वारे प्रचार
विविध चित्रपटांच्या गाण्यांवर प्रचाराची ध्वनिफीत तयार करण्यात येते. यातून मनोरंजनासह मतदारांना उमेदवारांचे नाव व निवडणूक चिन्ह लक्षात राहील असा प्रयत्न केला जातो. असा प्रकार या वेळीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बघायला व ऐकावयास मिळत आहे. प्रचार जसजसा पुढे जाईल, तसतशी अधिक रंगत वाढत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The slogan 'Pay attention, give vote' in the campaign