कल्व्हर्टच्या कामाला संथगती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील गणपती पाडा परिसरात पालिकेच्या माध्यमातून पेट्रोलपंपासमोरील नाल्यावर भिंत बांधण्याचे काम करण्यात येत आहे. ही भिंत बांधताना जुना ठाणे-बेलापूर रस्त्यावर कल्व्हर्ट बांधण्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे कलव्हर्ट  बांधण्याचे हे काम संथ गतीने सुरू असल्याने हा रस्ता मागील अडीच महिन्यांपासून बंद करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील गणपती पाडा परिसरात पालिकेच्या माध्यमातून पेट्रोलपंपासमोरील नाल्यावर भिंत बांधण्याचे काम करण्यात येत आहे. ही भिंत बांधताना जुना ठाणे-बेलापूर रस्त्यावर कल्व्हर्ट बांधण्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे कलव्हर्ट  बांधण्याचे हे काम संथ गतीने सुरू असल्याने हा रस्ता मागील अडीच महिन्यांपासून बंद करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

माजी पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी २५ मेनंतर मान्सूनमध्ये खोदकाम करण्यास मनाई केलेली असतानादेखील दिघामध्ये बिनधास्तपणे रस्ता खोदून, त्या ठिकाणी कल्व्हर्ट बांधण्याचे काम सुरू आहे. ठाणे-बेलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर जुना ठाणे-बेलापूर या पर्यायी रस्त्याचा वापर करण्यात येतो. मात्र, ऐन पावसातच कल्व्हर्टचे काम काढून रस्ता बंद करण्यात आल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे; तर या ठिकाणी काम सुरू असल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे. याचा साधा फलकदेखील ठेकेदाराने लावण्याची तसदी घेतली नाही. 

जुना ठाणे-बेलापूर रस्ता बंद असल्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून गणपती पाडा येथील अंतर्गत असणाऱ्या मार्गाचा वापर दुचाकी वाहनचालक करत असतात. मात्र, मागील महिनाभरापासून या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची होणाऱ्या वर्दळीमुळे व संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत; तर गटारावरील झाकणेदेखील मोडकळीस आली आहेत. या मार्गावर दुचाकी वाहनचालकांचे किरकोळ अपघातदेखील होत आहेत. या ठिकाणी कलव्हर्टचे काम सुरू असून गणपती पाड्यातील रिक्षाचालकदेखील या रस्त्याचा वापर करतात; त्यामुळे येथील रहिवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. यासंदर्भात दिघा विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर पवार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

ऐन पावसाळ्यामध्ये महामार्गाच्या कल्व्हर्टचे काम करण्यात येत असून, या कामामुळे अडीच महिन्यापासून येथील रस्ता बंद ठेवण्यात आला आहे; तर कल्व्हर्टच्या कामामुळे अंतर्गत रस्त्यावरून वाहनांचा मोठ्या प्रमाणात झालेल्या वापरामुळे पेव्हर ब्लॉक उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना येथून वाहन चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- सुरेश करंडे, रहिवासी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slow down the work of culvert