कॉंग्रेसच्या अजेंड्यावर आता झोपडपट्ट्यांची "व्होट बॅंक' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - झोपडपट्ट्यांमधील मतदारांचा जनाधार पुन्हा मिळविण्यासाठी कॉंग्रेसने झोपडपट्ट्यांचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. 10 लाख झोपडीवासीयांच्या वनजमिनी गिळंकृत करण्याच्या हालचाली सरकारमधील मंत्र्यांनी सुरू केल्याचा खळबळजनक आरोप कॉंग्रेसने केला. त्याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार कॉंग्रेसने व्यक्त केला आहे. 

मुंबईतील 2000 पर्यंतच्या झोपड्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने संरक्षण दिले होते. आता शिवसेना-भाजपच्या सरकारने वनजमिनींवरील झोपड्यांवर कारवाई सुरू केली आहे, असा आरोप मंगळवारी (ता. 24) एका पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला. जोगेश्‍वरी पूर्वेतील इंदिरानगर रहिवासी संघातील झोपड्या गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पाडल्याचा आरोपच त्यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवसेना-भाजपवर आरोप करून झोपड्यांच्या विषयावर "व्होट बॅंक' ताब्यात घेण्यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. झोपड्यांतील रहिवाशांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याचे आश्‍वासन त्यांना दिले, अशी माहितीही वाघमारे यांनी दिली. रहिवासी 1970पासून इंदिरानगर रहिवासी संघातील झोपडपट्टीत राहत आहेत. असे असताना त्यांना हटविण्याचा डाव शिजत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला. झोपडीवासीयांना बेघर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा त्यांनी निषेध केला. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने झोपडीवासीयांच्या व्होट बॅंकेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, राज्यमंत्री वायकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: Slums Vote Bank