भिवंडीत डेंगीने लहानग्याचा मृत्यू

File Photo
File Photo

भिवंडी : भिवंडी शहर महानगरपालिका क्षेत्रात दोन महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मलेरिया, टायफॉईड आदींसह डेंगीसारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातील नारपोली परिसरातील देवजीनगर आदेश्वर टॉवरमध्ये राहणाऱ्या सात वर्षीय मुलाचा डेंगीने उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन महिन्यांत डेंगीमुळे सहा जणांचे बळी गेले असून या आजाराच्या वाढत्या प्रकोपाने शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

युवम निकुंज शहा (७, रा. आदेश्वर टॉवर, देवजीनगर) असे डेंगीने बळी गेलेल्या मुलाचे नाव आहे. तो इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होता. त्याला दोन दिवसांपूर्वी सकाळी ताप आला म्हणून कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवाळी सणात डॉक्‍टर सुट्टीवर असल्याने त्याच्यावर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तत्काळ ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना युवमचा काल सायंकाळी मृत्यू झाला. त्याच्यावर रात्री उशिराने अंजूरफाटा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान आयुक्त व शासनाने या प्रकरणी लक्ष द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी यांनी केली आहे.  पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना त्यांनी निवेदनही सादर केले.

पालिकेच्या दुर्लक्षामुळेच साथीच्या आजारात वाढ!
भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत डेंगीचे ३५ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी आतापर्यंत सहा जणांचे बळी गेले आहेत. गेल्या आठवड्यात गोकुळनगर येथील रमेश भंडारी या नवविवाहित तरुणाचा डेंगीने मृत्यू झाला होता. पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व ठेकेदारांनी शहरातील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गटार-नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने शहरात साथीचे रोग फैलावत असल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून नागरिकांना दिलासा देणे आवश्‍यक आहे. कामचुकारपणा करणाऱ्या आरोग्य विभागाच्या व प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
- यशवंत टावरे,
विरोधी पक्षनेते, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com