लघुकथांवर आधारित लघुपटनिर्मितीची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

"ग्रंथाली'च्या वाचक दिनानिमित्त लघुकथांवर आधारित प्रथमच लघुपट स्पर्धा  घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा अकरावी ते पदवी-पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. 

मुंबई ः "ग्रंथाली'च्या वाचक दिनानिमित्त लघुकथांवर आधारित लघुपट स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अकरावी ते पदवी-पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. 

या स्पर्धेसाठी "ग्रंथाली'च्या वतीने सुप्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 नोव्हेंबरला एकदिवसीय विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत लघुकथा ते लघुपट या प्रवासासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. 

6 नोव्हेंबरला प्रभादेवी येथील कीर्ती महाविद्यालयात सकाळी 11 ते 5 या वेळेत ही कार्यशाळा होईल. या स्पर्धेसाठी 3 नोव्हेंबर ही प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख असून, प्रवेशसंख्या 60 इतकी मर्यादित आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश देण्यात येईल.

सहभागी विद्यार्थ्यांना पाच लघुकथा देण्यात येतील. त्यावर स्पर्धकांनी 5 ते 15 मिनिटांचे लघुपट सादर करणे अपेक्षित आहे. कार्यशाळेनंतर सहभागी विद्यार्थ्यांना लघुपट बनवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल. त्यानंतर सादर झालेल्या लघुपटांचे परीक्षण अशोक राणे यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळ करणार आहे. विजेत्यांना "ग्रंथाली'तर्फे 25 डिसेंबर रोजी वाचकदिनी पारितोषिक, सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात येईल.

प्रवेशिका granthali.short.films@gmail.com या मेलवर 15 डिसेंबरपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी संपर्क ः डॉ. लतिका भानुशाली- 9322207878 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

विजेत्यांना रोख पारितोषिके 

उत्कृष्ट पटकथा संवाद लेखक ठरणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 15 हजार, 10 व पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. त्यांच्या पटकथा "ग्रंथाली'च्या शब्दरुची मासिकात प्रसिद्ध केल्या जातील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Small stories based Documentary Competition