स्मार्ट सिटीचे अग्निशमन दल पाण्याविना

File Photo
File Photo

ठाणे : अग्निशमन दलाचे मुख्यालय असलेल्या नितीन कंपनीपासून पाच मिनिटांच्या अंतरावर गेल्या महिन्यात एका कार्यालयात आग लागलेली होती. अशा वेळी नेहमीच्या पद्धतीने सायरन वाजवीत येथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या होत्या. मात्र आग विझविण्यास सुरुवात केल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडीत पाणीच नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आल्याची गंभीर बाब आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली.

विशेष म्हणजे या गाडीत पाणी नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते. तसेच त्याबाबतचा जाब उपस्थित अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला होता; पण त्यानंतरही या आग विझविण्याच्या घटनेचा अहवाल सादर करताना या गाडीत पाणी असल्याचा बनावट अहवाल तयार करण्यात आल्याचा आरोप आजच्या बैठकीत सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी केला.

अशा प्रकारे खोटा अहवाल तयार करून नागरिकांच्या जीविताबरोबर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.

महापालिका मुख्यालयाजवळील उत्सव हॉटेलच्या पाठीमागील श्री सारिका सोसायटीतील एका बिल्डरच्या कार्यालयाला अचानक आग लागून संपूर्ण कार्यालय खाक झाले होते. त्या दिवशी रविवार असल्याने कार्यालयात कोणीही कर्मचारी नसल्याने कोणाच्या जीविताला धोका पोहोचला नव्हता.

सभागृह नेते संतापले
विशेष म्हणजे कोणतीही आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाकडून त्याबाबतचा अहवाल तयार केला जातो. या आगीचा अहवाल तयार करताना ही विझविताना पुरेसे पाणी होते, असा अहवाल तत्कालीन अधिकाऱ्यांनी तयार केल्याचे कळते. प्रत्यक्ष घटनास्थळी आपण उपस्थित असतानाही जर असे खोटे अहवाल तयार होत असतील, तर इतर वेळी या विभागाचा काय कारभार चालत असेल, याबद्दल म्हस्के यांनी संताप व्यक्त केला.

वरिष्ठांना अंधारात ठेवून अहवाल 
दरम्यान, अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी या आगीचा अहवालच आपल्याला अद्याप मिळाला नसल्याचे या बैठकीत सांगितले. त्यामुळे मुख्य अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून असे अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली. अखेर बैठकीत या विषयावरून वातावरण तापल्यानंतर या आगीची आणि त्या अहवालाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन समीर उन्हाळे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com