कल्याण - स्मार्ट सिटीचा निधी मिळूनही काम सुरु न करणारी महापालिका

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 4 मे 2018

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. शासनाकडून स्मार्ट सिटी साठी आलेले 283 कोटी रुपये महानगरपालिकेत पडून आहेत. निधी असून स्मार्ट सिटीचे काम सुरु न करणारी ही एकमेव महानगरपालिका याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. शासनाकडून स्मार्ट सिटी साठी आलेले 283 कोटी रुपये महानगरपालिकेत पडून आहेत. निधी असून स्मार्ट सिटीचे काम सुरु न करणारी ही एकमेव महानगरपालिका याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

सार्वजनिक समाजहिताच्या कामांना प्राधान्य  न देता अधिकारीवर्ग शिवसेनेच्या काही नगरसेवकांच्या हितसंबांधाची कामे करण्यात मग्न असतात व भाजप नगरसेवकांची पालिकेत खडखडाट आहे हे कारण सांगून सतत दिशाभूल करतात असे उदाहरणांसह आयुक्त गोविंद बोडके यांच्या निदर्शनास आणून देत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण चव्हाण यांनी गुरुवारी मंत्रलयात झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी व नगर रचनाचे  टेंगळे यांची चांगलीच झाडाझडती करत धारेवर घेतले.

वेळेत कामे होत नाहित त्यासाठी संबंधित अधिका-यांवर जबाबदारी देऊन वेळेचे बंधन निश्चित करून न झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करा असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. ही बैठक केवळ चर्चा करण्यासाठी नव्हे तर रखडलेली विकासकामे लवकरात लवकर व वेळेत मार्गी लागावी या उद्दीष्टाने असल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.                  

प्राधान्याने आरोग्य सुविधेवर भर देऊन रुक्मीणी बाई,शास्त्रीनगर व सुतिकागृह येथे आद्यावत यंत्र सामुग्री व तज्ञ डॉक्टरांची भरती यावर तातडीने लक्ष द्या.कमी पगारामुळे येथे अनेक वेळा जाहिराती देऊन डॉक्टर येत नाहीत. त्यासाठी नवीन सुधारीत वेतनश्रेणी द्या. पश्चिमेकडील मच्छीमार्केटचे नुतनीकरण, प्रभागातील अंतर्गत रस्ते, डंपिंगग्राऊंड, ठाकुर्ली व माणकोली उड्डाण पुलाच्या कामात आवश्यक जमीन अधिग्रहण कार्यक्रमास प्राधान्य, घनकचरा व्यवस्थापन, पार्कींग धोरण ठरवून आंमलात आणणे, वैद्यकीय व नर्सिंग कॉलेज सुरु करणे, शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदन  व्यवस्था करणे, अमृत योजनेत पिण्याचे पाणी व सांडपाणी नियोजन, बी.एस.यु.पी. पंतप्रधान आवास योजना, एन.यु.एल.एम रोजगार स्वयंरोजगार, रखडलेले रस्ते अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

अर्थसंकल्पातील भाजप नगरसेववकांची कामे होत नाहीत. कामे होत नाहीत केवळ शिवसेनेची कामे होतात असा आरोप यावेळी भाजपा नगरसेवक विकास म्हात्रे यांच्याकडून करण्यात आला. डोंबिवलीतील सुतिकागृह बंद असल्याने गर्भवती महिलांची परवड होत आहे. दोन वर्षात बंद सुतिकागृह पुन्हा पुर्वीसारखे सुरू करा सरकार त्यासाठी आवश्यक निधी देईल असे चव्हाण यांनी सांगितले. वाहतुककोंडी फोडण्याबरोबरच पार्किगचे नियोजन काय केले ? ठाकुर्ली पुर्व-पश्चिम उड्डाणपुल पुढील कामाच्या भागाची निविदा कधी काढणार? 27 गावांमधील अमृतयोजनेसाठी सरकारकडून किती पैसे आले ही कामे केव्हा सुरू होणार? कच-याची समस्या कधी सोडविणार? हे प्रश्न राज्यमंत्री यांनी विचारले.यासर्वच बाबींवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगत एक ते दिड महिन्यात उंबर्डे प्रकल्प सुरू होईल असा दावा आयुक्त बोडके यांनी यावेळी केला.  सर्व विषयांवरील चर्चेनंतर कामांचा प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे वेळेत पूर्ण करा.अधिकारी जर कोणाच्या इशार्यावर एकतर्फी कामे करुन भाजप नगरसेवांची कामे डावलणार असतील तर योग्य होणार नाही असेही सुचीत करण्यात आले.

या  बैठकीला उपमहापौर मोरेश्वर भोईर, स्थायी समिती सभापती राहुल दामले, भाजपा गटनेते वरूण पाटील या भाजपाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांसह आयुक्त गोविंद बोडके, अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि इतर वरीष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते. आजच्या बैठकीत राज्यमंत्री यांनी जो आढावा घेतला तो ऐन महापौर निवडणुकीच्या वेळेसच का घेतला? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Web Title: smart city work still not started after funding also in kalyan