स्मार्ट मीटरचा वाद सभागृहात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

शहरात पाण्याच्या वापरानुसार पाणी बिल आकरण्यासाठी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण असे स्मार्ट मीटर कमी प्रमाणात असल्याने सुरवातीला केवळ मोठ्या गृहसंकुल अथवा व्यावसायिक कंपन्यांना बसविणे आवश्‍यक होते. पण हे स्मार्ट मीटर झोपडपट्टीमध्ये बसविले जात असल्याने नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली.

ठाणे : शहरात पाण्याच्या वापरानुसार पाणी बिल आकरण्यासाठी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण असे स्मार्ट मीटर कमी प्रमाणात असल्याने सुरवातीला केवळ मोठ्या गृहसंकुल अथवा व्यावसायिक कंपन्यांना बसविणे आवश्‍यक होते. पण हे स्मार्ट मीटर झोपडपट्टीमध्ये बसविले जात असल्याने नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली. मात्र, प्रायोगिक तत्वावर असे मीटर बसविण्यात आले असून पुढील झोपडपट्टी भागात असे मीटर बसविण्यास प्राधान्य नसणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

ठाण्यात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता स्मार्ट मीटर बसविण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार शहरात पहिल्या टप्प्यात एक लाख 40 हजार मीटर बसविले जाणार असून आतापर्यंत 22 हजारांहून अधिक मीटर बसविण्यात आले आहेत. घोडबंदर, माजिवडा शहरातील काही भाग अशा भागात हे मीटर बसविण्यात आले आहेत.

मात्र, सुरुवातीला केवळ कमर्शियल आणि सोसायटीना हे मीटर बसवण्याचे आदेश असताना महापौरांच्या मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत, दिवा, मुंब्रा, कोलशेत अशा अनेक झोपडपट्टी भागात हे स्मार्ट मीटर बसवण्यात आले असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनीच आज सभागृहात दिली. त्याचबरोबर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीदेखील आपल्या प्रभागात झोपडपट्टी विभागाचा परिसर अधिकचा असूनही स्मार्ट मीटर बसवण्याची विचारणा होत असल्याने नेमका हा काय प्रकार आहे, असा प्रश्‍न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. 

झोपडपट्टीतील कामे थांबविण्याची मागणी 
या वेळी कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी सांगितले, की झोपडपट्टी विभागात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर केवळ कमर्शियल आणि सोसायटीनाच हे मीटर बसवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील व्यावसायिक वापराला सुरुवतीच्या टप्प्यात मीटर बसविले जाणार असल्याचे सांगितले. आजच्या घडीला पाच लाखांपेक्षा अधिक नळ कनेक्‍शनधारक असून एकाच वेळी एवढ्या कनेक्‍शनवर स्मार्ट मीटर बसवणे शक्‍य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात केवळ एक लाख 40 हजार मीटर बनवण्यात येणार असून त्यानंतरच्या टप्प्यात सर्व ठिकाणी मीटर बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या उत्तरावरदेखील नगरसेवक समाधानी न झाल्याने ज्या ठिकाणी अशाप्रकारचे झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू करण्यात आली आहे, ती कामे त्वरित थांबवण्यात यावी असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असल्याची माहिती सभागृहात अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

अशी आहे स्मार्ट वॉटर मीटर योजना 
पाणी गळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने हे स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. यासाठी 131 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. त्यानुसार मागील चार महिन्यांपासून हे मीटर बसविण्यास सुरवात झाली आहे. शहरातील विविध भागांत अशा प्रकारे स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत 22 हजारांहून अधिक मीटर बसविण्यात आले आहेत. या कामासाठी स्मार्ट सीटी अंतर्गत 93 कोटींचा खर्च केला जात असून पुढील निगा आणि देखभालीसाठीचा पुढील पाच वर्षांचा खर्च हा पालिका करणार आहे. यासाठी खाजगी एजेन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. हे मीटर घोडबंदर भागातील सोसायटी, झोपडपट्टी भाग, माजिवडा, वागळे इस्टेट, शहरातील काही भाग अशा पद्धतीने हे मीटर बसविण्यात आले आहेत. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart meter debate in the hall