ठाण्यातील स्मार्ट मीटर योजना वादात 

नळाला लावलेले स्मार्ट मीटर.
नळाला लावलेले स्मार्ट मीटर.

ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे "स्मार्ट सीटी' योजनेंतर्गत तब्बल 1 लाख 40 हजार पाण्याचे "स्मार्ट मीटर' बसविण्यात येणार आहेत. हे स्मार्ट मीटर सोसायटी आणि व्यापारी गाळे यांना बसविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आहेत; मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करीत झोपडपट्टी व चाळीतही मीटर लावल्याने "स्मार्ट मीटर' योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याचे पडसाद नुकताच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटताच झोपडपट्टीत लावलेले मीटर काढून टाकण्यासह मीटर लावण्याचे काम थांबवण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते; तरीही शहरातील अनेक झोपडपट्टीत अद्यापही स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरूच असल्याने ठेकेदाराने आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट होत आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा आणि बिलवसुलीसाठी अमलात आणलेली स्मार्ट मीटर योजना ठाण्यात लागू करण्यात आली. ठाण्यातील मोठी गृहसंकुले आणि व्यावसायिक गाळे यांना पहिल्या टप्प्यात नळजोडणीला स्मार्ट मीटर लावण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. ठाण्यातील गृहसंकुले-व्यापारी गाळे आणि चाळीत आतापर्यंत पालिका पाणीपुरवठा अधिकारी यांनी 22 हजारांपेक्षा जास्त मीटर बसविले. घोडबंदर रोड आणि माजिवडा यांसह शहरातील चाळीत हे मीटर बसविल्याने अन्य रहिवासी लोकप्रतिनिधींकडे धाव घेत असून हे स्मार्ट मीटर प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या डोक्‍याला ताप ठरले आहेत. 

नागरिकांनी मीटरबाबत नगरसेवकांना जाब विचारल्याने नुकत्याच पार पडलेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाण्याच्या लक्षवेधीमध्ये मीटरबाबत प्रशासनाला धारेवर धरून सभागृह डोक्‍यावर घेतले. पालिक अधिकारी मनमानी करून गोरगरिबांकडून महसूल वाढवण्याचे काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला. दस्तुरखुद्द महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या मानपाडा प्रभाग समिती हद्दीतील झोपडपट्टी भागातदेखील असे स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याची माहिती सभागृहात उघड केली.

त्यावर उत्तर देताना, "ज्या ठिकाणी अशा प्रकारे झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत, ती कामे त्वरित थांबवण्यात यावीत,' असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. मात्र आयुक्तांच्या आदेशानंतरही झोपडपट्टी भागात ठेकेदाराकडून मीटर जोडणीचे काम अव्याहतपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

आमच्याकडे आदेश आलाच नाही! 
ठाणे पूर्वेकडील साईनाथ नगर भागात गेले दोन दिवस स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असून ठेकेदाराच्या माणसांनी आमच्यापर्यंत अद्याप कुठलेही आदेश आले नसल्याचे सांगितले. दरम्यान, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे आणि स्मार्ट मीटर जोडणीचे कामकाज पाहणारे कार्यकारी अभियंता विकास ढोले यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

वास्तविक मोठी गृहसंकुले आणि व्यावसायिक आस्थापनांना स्मार्ट मीटर लावण्यात येत असून झोपडपट्टी व चाळीत स्मार्ट मीटर बसवू नये, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत; तरीही कुठे अशा प्रकारे आदेशाचे उल्लंघन होत असेल, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. 
- संदीप माळवी 
उपायुक्त, ठाणे पालिका 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com