स्मार्ट टीव्हीचे तुमच्या खासगी क्षणांवर लक्ष!

अनिश पाटील
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मुंबई : सुरतमधील एक दाम्पत्य. एके दिवशी त्यांना अचानक आपल्या काही खासगी क्षणांची चित्रफीत इंटरनेटवर दिसली. ते अवाक्‌ झाले. घाबरले. आपल्या शयनगृहात घुसून कोणी आणि कसे हे चित्रीकरण केले हे त्यांना समजेना. त्यांनी एका संगणकतज्ज्ञ मित्राला बोलावले. त्याने सगळी तपासणी केली; परंतु कोठेही कॅमेरा सापडला नाही त्याला. अचानक त्याची नजर शयनगृहातील स्मार्ट टीव्हीवर गेली आणि क्षणात त्या सगळ्याचा उलगडा झाला. त्या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अज्ञात ‘हॅकर’ म्हणजेच सायबर-शर्विलकाने त्या दाम्पत्याच्या नकळत त्यांची चित्रफीत तयार करून एका अश्‍लील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. ही ८ जुलैची घटना.

मुंबई : सुरतमधील एक दाम्पत्य. एके दिवशी त्यांना अचानक आपल्या काही खासगी क्षणांची चित्रफीत इंटरनेटवर दिसली. ते अवाक्‌ झाले. घाबरले. आपल्या शयनगृहात घुसून कोणी आणि कसे हे चित्रीकरण केले हे त्यांना समजेना. त्यांनी एका संगणकतज्ज्ञ मित्राला बोलावले. त्याने सगळी तपासणी केली; परंतु कोठेही कॅमेरा सापडला नाही त्याला. अचानक त्याची नजर शयनगृहातील स्मार्ट टीव्हीवर गेली आणि क्षणात त्या सगळ्याचा उलगडा झाला. त्या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अज्ञात ‘हॅकर’ म्हणजेच सायबर-शर्विलकाने त्या दाम्पत्याच्या नकळत त्यांची चित्रफीत तयार करून एका अश्‍लील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. ही ८ जुलैची घटना. असाच आणखी एक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. स्मार्ट फोनप्रमाणेच स्मार्ट टीव्हीही आपल्यावर पाळत ठेवण्याचे काम करू शकतो, हे यातून उघडकीस आले आहे. 

गेल्या काही वर्षांत भारतातील स्मार्ट टीव्हीची मागणी वाढत चालली असून, आताच सुमारे १२ हजार कोटींचे हे‘मार्केट’आहे. या टीव्हीच्या किमती १२ हजारांपासून दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत आहेत. कॉर्पोरेट कार्यालये, हॉटेले अशा ठिकाणीच पूर्वी दिसणारे हे टीव्ही आता मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाच्या घरांतही दिसू लागले आहेत; मात्र इंटरनेट किंवा वायफायला जोडलेल्या कोणत्याही उपकरणाप्रमाणेच हे टीव्हीही हॅक करता येऊ शकतात. त्या टीव्हीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसारख्या सुविधांसाठी बसवलेल्या कॅमेऱ्यामुळे त्यांचा धोका अधिकच वाढला असल्याचे सायबरतज्ज्ञ अंकुर पुराणिक यांनी सांगितले. 

हा टीव्ही नेमका कशा प्रकारे हॅक केला जाऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांनी सांगितले, की स्मार्ट टीव्ही हाही अखेर एक संगणकच आहे. त्यातील एखाद्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हॅकर त्यात ‘मालवेअर’ टाकू शकतात. त्यातून ते तुमच्या टीव्हीवर, त्यातील कॅमेरा आणि ध्वनिमुद्रक यांवर नियंत्रण मिळवू शकतात. एवढेच नव्हे, तर त्या टीव्हीला जोडलेल्या अन्य उपकरणांतही ते घुसखोरी करू शकतात. गुजरातमधील त्या दोन घटनांत हॅकरने अशाच प्रकारे दोन दाम्पत्यांचे खासगी क्षण चित्रीत केले होते. त्यातील एका जोडप्याला त्याने ब्लॅकमेलही केले होते. त्या प्रकरणी स्थानिक पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

असा होतो स्मार्ट टीव्ही ‘हॅक’... 
स्मार्ट टीव्हीमध्ये एखाद्या थर्ड पार्टी ॲप्लिकेशनमधून मालवेअर शिरते. मालवेअर हा एक प्रकारचा संगणक विषाणू. तो सर्वप्रथम टीव्हीतील सुरक्षा यंत्रणा उडवून टाकतो. मूळचे ॲप डिलिट करून त्या जागी त्याचेच हुबेहूब व्हर्जन तयार करतो. ही सर्व प्रक्रिया कुणाच्याही नकळत होत असते. ती झाली की हॅकर त्या टीव्हीवर नियंत्रण मिळवू शकतो. तुम्ही टीव्हीवर एखादा कार्यक्रम पाहात असतानाही तो तुमचे चित्रीकरण वा आवाजाचे ध्वनिमुद्रण करू शकतो. वायफायमार्फत हॅकर टीव्हीला विविध आदेश देऊ शकतो. अशा प्रकारचे ‘एजंट स्मिथ’ हे मालवेअर सध्या चर्चेत आहे. जगातील २.५ कोटी फोन व इतर उपकरणांमध्ये ते घुसले असून, त्यातील १.५ कोटी ॲण्ड्रॉइड मोबाईल भारतातील असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. हे मालवेअर गुगल ॲप्लिकेशन म्हणून समोर येते. एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये अपडेटरच्या नावाने याच्या फाईल साठवलेल्या असतात. टीव्ही 
अथवा फोनमध्ये शिरल्यानंतर सुरक्षा यंत्रणा विस्कळित करून हे मालवेअर फसव्या जाहिराती दाखवायला सुरुवात करते.

अशी काळजी घ्या... 

  •  टीव्हीमध्ये अनोळखी ॲप्लिकेशन डाऊलोड करू नका. 
  •  चांगले अँटी वायरस इन्स्टॉल करा. 
  •  टीव्ही सतत वायफायला कनेक्‍ट ठेऊ नका. 
  •  गरज नसल्यास टीव्हीचा कॅमेरा झाकून ठेवा.
  •  गरज नसल्यास टीव्हीचा प्लग काढून ठेवा. 
  •  हॉटेलमधील तुमच्या खोलीतील स्मार्ट टीव्ही टॉवेलने झाकून टाका. 
  •  संशय आल्यास सायबर तज्ज्ञाकडून तपासणी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smart tv keeps eye on you