थंडीसोबत धुरक्‍याचा कहर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 जानेवारी 2019

नवी मुंबई - वाढत्या थंडीसोबत वातावरणात धूलिकणांच्या अतिप्रमाणामुळे नवी मुंबईत चार - पाच दिवसांपासून धुरके वाढले आहे. या संदर्भात "सफर'च्या संकेतस्थळावर नोंद झाली आहे. तर, वाढणाऱ्या धूलिकणांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवतींना श्‍वसनाचे आजार होण्याची भीती डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. 

नवी मुंबई - वाढत्या थंडीसोबत वातावरणात धूलिकणांच्या अतिप्रमाणामुळे नवी मुंबईत चार - पाच दिवसांपासून धुरके वाढले आहे. या संदर्भात "सफर'च्या संकेतस्थळावर नोंद झाली आहे. तर, वाढणाऱ्या धूलिकणांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवतींना श्‍वसनाचे आजार होण्याची भीती डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे. 

राज्यात कडाक्‍याची थंडी पडली आहे. नवी मुंबई आणि पनवेल-उरण या शहरांनाही थंडीचा तडाखा बसला आहे. परंतु, काही दिवसांपासून थंडीसोबत वातावरणात धूलिकणांचे प्रमाणही वाढले आहे. संध्याकाळी 6 नंतर त्यामध्ये अधिक वाढ होते. धुरक्‍यामुळे सकाळीही 100 फुटांच्या अंतरावरील दृश्‍य स्पष्ट दिसत नाही. काही जण त्याला धुके म्हणत असले, तरी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ते धुरके आहे. 

थंडीमुळे हवेतील धूळ आकाशात न जाता खालील वातावरणात मिसळते. त्यामुळे धुरक्‍यांचे प्रमाण वाढत असल्याचे निष्कर्ष आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी उलवे परिसरात डोंगर सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरूंग स्फोट घडवण्यात येत आहेत. त्यातच जेएनपीटी ते पळस्पे आणि जेएनपीटी ते सीबीडी या रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्यानेही त्याचा परिणाम तिन्ही शहरांतील वातावरणावर झाला आहे. 

श्‍वसनाच्या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना श्‍वास घेण्यास अधिक त्रास होतो. घशाचे आजार, दमा, सर्दी, खोकला अशा प्रकारचे आजार धूलिकणांमुळे होतात, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. 

सफर संस्थेने नोंद केलेले धूलिकणांचे प्रमाण 
3 जानेवारी - 320 पीएम 2.5 
4 जानेवारी - 311 पीएम 2.5 
5 जानेवारी - 324 पीएम 2.5 
6 जानेवारी - 321 पीएम 2.5 

पीएम 2.5 म्हणजे काय 
पीएम 2.5 म्हणजे अतिसूक्ष्म धूलिकण होय. दुर्बिणीने दिसणाऱ्या अतिसूक्ष्म धूलिकणांची नोंद पीएम 2.5 मध्ये मोजली जाते. धूलिकरण अतिशय वाईट परिस्थिती असल्यास श्‍वास घेण्यास त्रास होणे, हृदय आणि फुप्फुसाचे आजार होणे, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होण्याची शक्‍यता "सफर'च्या संकेतस्थळावर नमूद केले आहे.

Web Title: Smoke with winter season