निवडणुकीचा सोशल ज्वर  

मयूरी चव्हाण-काकडे -सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत रस्त्यांवरील प्रचारांबरोबर सोशल मीडियावरही प्रचाराचा रंग चढला आहे... 

उल्हासनगर -  ‘आता विजय आपलाच’, ‘अमुक अमुक पक्षाला मत म्हणजे विकासाला मत’, ‘एकच वादा...अमुक तमुक दादा’, ‘अरे आवाज कोणाचा...’ अशा एक ना अनेक  घोषवाक्‍यांचा सध्या सोशल मीडियावर पाऊस पडत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा बिगूल वाजून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पूर्वी रस्त्या-रस्त्यांवर उतरून प्रचाराचा धुरळा उडवला जायचा. आता मात्र याच्या जोडीने सोशल मीडियावरही निवडणुकीच्या प्रचाराला जोर शोर से सुरुवात झाली आहे. यामुळे वॉट्‌सॲप, ट्‌विटर, फेसबुकसारखी सोशल मीडियाही निवडणुकीच्या रंगात रंगून गेली आहेत. 

निवडणुकांच्या तारखा घोषित होताच ‘कार्यकर्त्यांनो, कामाला लागा’ असा सल्ला प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. आता सगळेच मतदार हे टेक्‍नोसॅव्ही झालेले असल्यामुळे अशा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे यंत्रणा कामाला लावली आहे. यासाठी खास कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. हे कार्यकर्ते सोशल मीडियावर आपल्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करत आहेत. आपला उमेदवार आणि आपलाच पक्ष कसा श्रेष्ठ आहे, हे पटवून देणारे मेसेज सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर प्रचारसभांमध्ये विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे; तशीच बोचरी टीका, टिंगल सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर धनुष्यबाण, घड्याळ, रेल्वे इंजिन, हाताचा पंजा आणि कमळ यांचे जोरदार मीडिया वॉर  कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाले आहे. निवडणुकांच्या तोंडावर घड्याळातल्या अनेक महत्त्वाच्या काट्यांनी  कमळ हातात घेतल्यामुळे घड्याळाची टिक टिक कमी झाली आहे. त्यामुळे कमळ आणि घड्याळाचे कार्यकर्ते एकमेकांवर मनसोक्त तोंडसुख घेत आहेत.

सोशल मीडिया फोटोफुल्ल
उन्हाला अद्याप सुरुवात झाली  नसली, तरी निवडणुकांमुळे सोशल मीडियावर मात्र प्रचाराचा वणवा  जोरात पेटला आहे. पक्षाची राजनीती निश्‍चित करण्यासाठी व्हॉट्‌सॲपवर विविध पक्षांचे समूह तयार झाले आहेत. फेसबुकवर विविध पक्षांचे, स्थानिक पातळीवर विशिष्ट पक्षाचे, उमेदवाराचे नवीन पेज बनवले असून उमेदवारांच्या पेजला जास्तीत जास्त लाईक्‍स कसे मिळतील, याची पुरेपूर काळजीही  कार्यकर्ते घेत आहेत. एखाद्या कार्यक्रमाचे फोटो, केलेल्या विकासकामांची फोटोसकट माहितीही  कार्यकर्ते फेसबुकवर अपलोड करत आहेत. कुणा भाऊंचा गॉगल लावून फोटो; तर कुणा दादांचा  एकदम हटके स्टाईलमधील फोटो. अशा या ‘फोटोंच्या भाऊगर्दी‘ने सोशल मीडिया हाऊसफुल्ल झाले आहे. 

मतदारांना  भावनिक साद

मंदावलेल्या इंजिनाच्या वेगाला गती देण्यासाठी इंजिनाचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना भावनिक साद घालून पक्षामध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.   आयाराम-गयारामांच्या पक्षांतरामुळे एकमेकांना कोपरखळ्या मारण्याचे कामही मोठ्या शिताफीने फेसबुकवर सुरू झाले; तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी  प्रोफाईल फोटोवर वरिष्ठ नेत्यांचे फोटोही अपलोड केले आहे. स्वत:च्या  मूठभर  विकासकामांची  हातभर लोकप्रियता करण्यासाठी अन्‌  दुसऱ्या पक्षावर टीकेची झोड उठवून मत, प्रचार आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी सोशल मीडिया या खुल्या व्यासपीठाचा वापर राजकीय पक्ष करत आहेत.

Web Title: Social election fever