केशवसुत यांनी समाजाला बदलण्याचे काम केले - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - 'कवी केशवसुत यांनी कमी वयात खूप चांगली साहित्यनिर्मिती केली. समाजाला बदलण्याचे काम त्यांनी केले,'' अशी भावना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्‍त केली. दादर ते सावंतवाडी ते दादर राज्यराणी ट्रेनचा नामकरण सोहळा दादर येथे पार पडला. राज्यराणी ट्रेनला कवी केशवसुत यांच्या तुतारी कवितेचे नाव देण्यात आले. त्या वेळी केशवसुत यांच्याबद्दल प्रभू यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

'साहित्यिक हे समाजाला बदलण्याबरोबरच नवीन दिशा देण्याचे काम करतात, ते काम केशवसुत यांनी केले,'' असे प्रभू या वेळी म्हणाले. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री अनंत गिते, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष महेश केळुस्कर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आदी उपस्थित होते. दादर ते सावंतवाडी राज्यराणी ट्रेन एक जुलै 2011 रोजी सुरू करण्यात आली होती. या गाडीला कवी केशवसुत यांच्या तुतारी या कवितेचे नाव देण्याची मागणी केली जात होती आणि ती मान्य करत सोमवारी नामकरण सोहळा पार पडला. या वेळी मधु मंगेश कर्णिक म्हणाले, 'केशवसुतांच्या स्मारकासाठी आम्ही 25 वर्षे लढलो, तर गेली दहा वर्षे रेल्वेला त्यांचे नाव देण्याचीही आमची मागणी प्रलंबित होती आणि अखेर ती मान्य करण्यात आली. आता केशवसुतांचे नावही रेल्वेच्या नकाशावर गेले, ही अभिनंदनास्पद बाब आहे.''

Web Title: society change work by keshavsut