हायप्रोफाईल आरोपी... फितूर साक्षीदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

मुंबई - सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी सरकारी आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद सहा डिसेंबरला पूर्ण झाल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या खटल्यात तब्बल 24 हजार पाने आणि 700 साक्षीदारांपैकी 210 साक्षीदारांची प्रत्यक्ष साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. घटनेनंतर पाच वर्षांनी सीबीआयने तपासाची सूत्रे हातात घेतली. 12 वर्षांनंतर पहिल्या साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. बदलत्या तपास यंत्रणा, बदलते न्यायाधीश आणि दोषमुक्त झालेले हायप्रोफाईल आरोपी, फितूर होणारे सरकारी साक्षीदार आदी कारणांमुळे हा खटला कायमच चर्चेत होता.

2003 मध्ये माजी आयपीएस अधिकारी डीजी वंजारा यांच्या आदेशानुसार सोहराबुद्दीनने गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पांड्या यांची हत्या केली, अशी साक्ष या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराने विशेष सीबीआय न्यायालयात दिली होती. या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार आझम खान, अपूर्वा जडेजा आणि दीनदयाल फितूर झाल्याचा परिणाम खटल्यावर झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आझम खान आणि पेट्रोल पंपचा मालक असलेला महेंद्र जाला या दोन साक्षीदारांची पुन्हा चौकशी करू द्यावी, अशी मागणी सीबीआयने बुधवारी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने अमान्य केली होती. त्यापैकी खान हा सोहराबुद्दीनचा सहकारी होता. या प्रकरणातील आरोपी आणि माजी पोलिस निरीक्षक अब्दुल रहमानने मला या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा जबाब त्याने नोंदवला होता.

Web Title: Soharabuddin Case Accused Witness Court