बड्या अधिकाऱ्यांच्या मुक्ततेविरोधात अपील नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीच्या खटल्यात बड्या पोलिस अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करणार नाही, असे सीबीआयच्या वतीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. दोषमुक्त झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये गुजरातचे तत्कालीन पोलिस महासंचालक डी. जी. वंजारा यांचा समावेश आहे.

या खटल्यात न्यायालयाने राजस्थानचे सनदी अधिकारी एम. एन. दिनेश, गुजरातचे सनदी अधिकारी राजकुमार पंडियन आदींनाही दोषमुक्त केले आहे. त्या विरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. सीबीआयने या खटल्यातून अन्य काही आरोपींच्या दोषमुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे; मात्र खटल्यातील मोठ्या अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात अपील न करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी दिली. या खटल्यातील एकूण 38 आरोपींपैकी 14 आरोपी बडे अधिकारी आहेत.

शेख आणि त्याची पत्नी सांगलीमध्ये असताना गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. नोव्हेंबर 2005 मध्ये शेखचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याचे, तर त्याची पत्नी गायब झाल्याचे दाखविण्यात आले. या चकमकीचा साक्षीदार असलेला शेखचा हस्तक तुलसी प्रजापतीही पोलिस चकमकीमध्ये मारला गेल्याचे सांगण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुजरातबाहेरील राज्यात करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: sohrabuddin shaikh bogus flint