सोलनपाडा तलावाला तडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुंबई : कर्जत तालुक्‍यात जामरूखजवळ असलेल्या सोलनपाडा पाझर तलावाला तडे गेले असून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी 26 जुलैपासून स्थलांतर केले आहे. धरणाची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी सोलनपाडा येथे जाऊन धरणाची पाहणी केली. मात्र लघुपाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी धरण परिसराची पाहणी करण्यासाठी न पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

कर्जत तालुक्‍यात 1980 मध्ये सोलनपाडा पाझर तलाव बांधण्यात आले आहे. या तलावाची दुरुस्ती रायगड जिल्हा परिषदेने तब्बल 6 कोटी रुपये खर्चून 5 वर्षांपूर्वी केली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरण परिसरात 200 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे खोदकाम आणि सुरुंग स्फोट करण्यास बंदी आहे. तरीही, येथे 100 मीटर अंतरावर खासगी जमीन घेणाऱ्यांनी खोदकाम आणि सुरुंग स्फोट केले आहेत. त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे.

या वर्षी पावसाळ्यात धरणाच्या मुख्य बांधामधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होऊ लागली होती. 26 जुलैच्या रात्री धरण भरून वाहू लागल्यानंतर धरणाच्या बांधामधून मोठ्या प्रमाणात सुरू असलेली पाणीगळती बघून ग्रामस्थ घाबरले होते. त्यांनी रात्रीच गाव सोडून सुरक्षित ठिकाण म्हणून जामरुख गाव गाठल्याची माहिती स्थानिक रहिवाशी मंगेश सावंत यांनी दिली.

परिस्थितीची पाहणी

धरण फुटून कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी सोलनपाडा धरणावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती नारायण डामसे, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक सावंत, भास्कर देसले, माजी सरपंच हरेश घुडे, पंढरीनाथ पिंपरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. तालुक्‍याचे तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार संजय भालेराव हेदेखील उपस्थित होते. आमदार सुरेश लाड यांनी धरणाची स्थिती आणि धोका यांची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली. 

डोंगरपाडा धरण वाहून गेल्यानंतर येथील ग्रामस्थांनी पाणीटंचाईचे चटके सोसले आहेत. त्यामुळे सोलनपाडा पाझर तलावाला प्राधान्य देऊन दुरुस्ती करून घेतली. आपल्याला माहिती मिळताच आपण येथे पोहचलो असून पाझर तलावाची स्थिती अभियंते यांच्याकडून जाणून घेतली जाईल. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नियोजन करणार आहोत. 
- सुरेश लाड, आमदार, कर्जत मतदारसंघ 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solanpada lake