सोलापूर महापालिकेच्या कारभाराचा मुद्दा अधिवेशनात मांडू : तटकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

''ज्या भाजपने सत्तेच्या काळात शिवसेनेला चार वर्षे अपमानाची वागणूक दिली. तोच भाजप आता युतीसाठी सेनेसमोर पायघड्या घालत आहे. राज्यात कधीही निवडणुका झाल्या तरीही या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज आहे''. 

- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

सोलापूर : सोलापूर महापालिकेने सर्वाधिक सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा विक्रम केला आहे. महापालिकेत भाजप एकहाती सत्ता येऊनदेखील सोलापुरकरांचे प्रश्‍न सुटले नाहीत. महापालिकेच्या कारभाराचा मुद्दा येत्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हल्लाबोल आंदोलनासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आज सोलापुरातील राष्ट्रवादी भवनात पत्रकार घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, शहराध्यक्ष भारत जाधव आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, ''ज्या भाजपने सत्तेच्या काळात शिवसेनेला चार वर्षे अपमानाची वागणूक दिली. तोच भाजप आता युतीसाठी सेनेसमोर पायघड्या घालत आहे. राज्यात कधीही निवडणुका झाल्या तरीही या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज आहे''. 

2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडून गेलेले नेते आता पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यादृष्टीने व्यूहरचना सुरू आहे. योग्यवेळी त्यांची घरवापसी होईल, असा विश्‍वासही तटकरे यांनी व्यक्त केला. 

हल्लाबोलच्या माध्यमातून राष्ट्रवादीने नेत्यांची मोट बांधून भाजप सरकारला हादरा दिला. विरोधी पक्षनेते मुंडे म्हणाले, राज्य सरकारमधील 16 भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे पुराव्यानिशी दिली आहेत. या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. राज्यातील दूध दराचा प्रश्‍न तीव्र झाला आहे. या प्रश्नाबद्दल सभागृहात सातत्याने आवाज उठविला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Solapur Corporation Working Report will submitted in Assembly Says Sunil Tatkare