पाकिस्तानच्या मगरमिठीतून सोडवा

श्‍याम देऊलकर
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

बलुची नेत्यांची स्वतंत्रतेची आस आम्ही समजू शकतो. आम्ही नेहमीच मानवी मूल्यांची जपणूक केली आहे. जागतिक व्यासपीठावर आम्ही त्यांची बाजू नक्की मांडू.

- गजेंद्रसिंह शेखावत, खासदार

बलुची नेत्यांची मुंबईत येऊन भारतीयांना आर्त साद
मुंबई - आम्हाला पाकिस्तानच्या मगरमिठीतून सोडवा, अशी आर्त साद बलुचिस्तानातील नेत्यांनी भारतीयांना घातली आहे. मुंबईत फिन्स (फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्‍युरिटी) या संस्थेतर्फे "आझाद बलुचिस्तान' या विषयावर शुक्रवारी (ता.18) रात्री समूह चर्चा घेण्यात आली. या वेळी उपस्थित बलुची नेत्यांनी पाकिस्तानी लष्कराकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचारांचा पाढा वाचला व "स्वतंत्र बलुचिस्तान'ची घोषणा केली.

"फिन्स' संस्थेतर्फे आयोजित या चर्चेला स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीच्या ज्येष्ठ नेत्या, लेखिका व चित्रपटनिर्मात्या प्रा. नाएला कादरी बलुच व या चळवळीचे तरुण कार्यकर्ते मझदाक बलुच उपस्थित होते. मझदाक बलुच यांनी बलुचिस्तानमधील सद्यस्थितीबाबत माहिती दिली. आमचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही. आमची संस्कृती, चालीरीती व परंपरा पूर्णतः वेगळ्या असून, आम्ही 70 वर्षे हा अन्याय, अत्याचार सोसत आहोत. आमचा संबंध असलाच तर इराणी व अफगाणी नागरिकांशी आहे; पण पाकिस्तानबद्दल आम्हाला कसलेही ममत्व नाही. पाकिस्तानी राज्यकर्ते व लष्कराने स्वर्ग असलेल्या आमच्या बलुचिस्तानचा नरक केला आहे, असा आरोप मझदाक यांनी या वेळी केला.

बलुचिस्तानचा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असून, पाकिस्तानने आजपर्यंत आमच्या प्रदेशाचा अनिर्बंध वापरच केला आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची निर्मिती अपरिहार्य असून, यासाठीच आम्ही भारताच्या मदतीकडे डोळे लावून बसलो आहोत, असे मझदाक म्हणाले.

पाकिस्तानने चीनला आमच्या डोक्‍यावर बसवले आहे. आम्ही त्यांचे वर्चस्व कदापि मान्य करणार नाही, असे बाणेदार उद्‌गार स्वतंत्र बलुचिस्तान चळवळीच्या ज्येष्ठ नेत्या प्रा. नाएला कादरी बलुच यांनी काढले. "चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर' भारताच्या दृष्टीने अत्यंत घातक असून तो "स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' या चीनच्या कारस्थानी धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे, असे त्या म्हणाल्या.

समूहचर्चेत "फिन्स'चे सदस्य व खासदार गजेंद्रसिंग शेखावत, माजी नौदल अधिकारी अलोक बन्सल, ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनीही भाग घेतला.

Web Title: Solve Pakistan by baluchistan leader