अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेतीत आमूलाग्र बदल - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई - राज्यातील 10 हजार ग्रामपंचायतींना 26 जानेवारीपर्यंत भारतनेट फायबर प्रोजेक्‍टद्वारे इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी दिली जाईल. कृषीक्षेत्रासाठी अत्याधुनिक हवामान केंद्र, ड्रोन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना स्मार्टफोनवर लघुसंदेश, ग्रामपंचायतींना इंटरनेट याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करता येईल. हे तंत्र देशभर वापरल्यास कृषी व सिंचन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. 29) व्यक्त केला.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे आयोजित "चौथी औद्योगिक क्रांती' या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. "ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर' या विषयावर ही कार्यशाळा आहे.

हवामानातील बदल, बेभरवशाचा पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य नाही. राज्यात दोन हजार ठिकाणी उभारलेली आधुनिक हवामान केंद्रे, ड्रोन तंत्रज्ञान आदींच्या हवामानविषयक घटकांचा आधीच अंदाज बांधता येईल आणि ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवता येईल. हे मॉडेल राज्यात यशस्वी झाल्यास देशभरात राबवता येईल, असे फडणवीस म्हणाले. ड्रोनच्या साह्याने जमिनीची मोजणी केल्याने महसुलातही वाढ होते, असेही त्यांनी सांगितले.

ड्रोनने औषधफवारणी
पिकांवर औषधफवारणी करताना विषबाधा होते; मात्र ही फवारणी ड्रोनच्या साह्याने केल्यास अशा घटना घडणार नाहीत आणि खर्चही वाचेल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले. ड्रोनद्वारे जमिनीची मोजणीही कमी वेळेत, कमी खर्चात व अचूकपणे होते, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Sophisticated technology is a major change in farming Devendra Fadnavis