प्रशस्त घर म्हणजे आलिशान जीवनशैली नव्हे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

मुंबई - आलिशान जीवनशैलीसाठी प्रशस्त घराऐवजी योग्य वातावरण, लोकवस्ती आणि साधने असणे आवश्‍यक असते, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने एका उच्चवर्गीय महिलेला दिला आहे. पतीने तीन बेडरूमचा फ्लॅट देण्याची तयारी दर्शवूनही चार बेडरूमच्या फ्लॅटची मागणी महिलेने न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. 

मुंबई - आलिशान जीवनशैलीसाठी प्रशस्त घराऐवजी योग्य वातावरण, लोकवस्ती आणि साधने असणे आवश्‍यक असते, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने एका उच्चवर्गीय महिलेला दिला आहे. पतीने तीन बेडरूमचा फ्लॅट देण्याची तयारी दर्शवूनही चार बेडरूमच्या फ्लॅटची मागणी महिलेने न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. 

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आणि क्‍लब, जिम अशी जीवनशैली जपणाऱ्या महिलेने स्वतःला आणि मुलांना निर्वाहभत्ता मिळण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 12 वर्षांपूर्वी या महिलेचा विवाह उच्चशिक्षित व्यावसायिकाबरोबर झाला होता. त्यांना दोन मुलेही झाली. पतीचे वागणे अनैतिक आहे, असे सांगून पत्नीने मुलांसह पाच वर्षांपूर्वी घर सोडले होते. पतीच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचार कायद्यानुसार पोलिस ठाण्यात फिर्यादही नोंदविली. स्वतःसाठी आणि मुलांसाठी अनुक्रमे पाच लाख आणि तीन लाख रुपये पोटगीची मागणीही तिने कुटुंब न्यायालयाकडे केली. कुटुंब न्यायालयाने ही मागणी अमान्य केली आणि 75 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली. या विरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

याचिकेवर न्या. भारती डांग्रे यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. पतीने पत्नी आणि मुलांची जबाबदारी मान्य करून त्यांच्यासाठी पर्यायी घर देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी दोन आणि तीन बेडरूमच्या फ्लॅटचे सविस्तर तपशिलही न्यायालयात दाखल केले; मात्र या फ्लॅटऐवजी चार बेडरूमचा आणि सर्व सुविधा असलेला फ्लॅट द्यावा, अशी मागणी करीत पत्नीने सर्व जागा नाकारल्या. आमच्या लाईफस्टाईलप्रमाणे जागा असावी, अशी मागणी तिने केली होती. मात्र हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. आलिशान लाईफस्टाईल म्हणजे केवळ मोठी जागा नाही, तर तेथील वातावरण आणि तेथे असलेल्या साधनांची उपलब्धता महत्त्वाची असते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. 

पोटगी वाढवून देण्याचा मुद्दा कुटुंब न्यायालयात मांडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. तसेच पतीने सुचविलेल्या फ्लॅटमधील फ्लॅट निवडीची मुभाही याचिकादाराला दिली आणि याचिका निकाली काढली. 

Web Title: Spacious house is not a luxury lifestyle