रायगडाच्या संवर्धनासाठी विशेष तटबंदी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

आकडेवारी 
आराखड्यातील कामे व खर्च (रुपयांत) 
- भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत केली जाणारी कामे ः 124 कोटी 14 लाख 
- रायगड किल्ला, पाचाड येथील समाधी, वाडा परिसरातील कामे ः 49 कोटी 52 लाख 
- परिसरातील पर्यटनाशी संबंधित कामे ः 78 कोटी 91 लाख 
- परिसरातील मूलभूत सुविधा (21 गावांचा परिघ) ः 43 कोटी 60 लाख 
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे ः 206 कोटी 4 लाख 
- भूसंपादन ः 25 कोटी 
- रज्जू मार्ग अर्थात रोप वे ः 50 कोटी 
- तातडीचा खर्च ः 28 कोटी 86 लाख 

 

मुंबई - रायगड किल्ला व परिसरात सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमातून पर्यटन विकास आराखड्यातील कामे सुरू आहेत. पुरातत्त्व विभागाने या कामांसाठी परवानगी दिली आहे. रायगड किल्ल्याभोवती विशेष तटबंदी, किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी विशेष कौशल्य असणारे कारागीर सार्वजनिक बांधकाम खात्याने उपलब्ध करून देणे; तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभागाच्या विश्रामगृहाची दुरुस्ती करणे आदी कामांचा यात समावेश आहे. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी किल्ले रायगड आणि परिसराचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रायगडाबाबत सर्व निर्णय घेत असून, याची अंमलबजावणी सरकारचे विविध विभाग करीत आहेत. या समितीने रायगडाच्या विकासासाठी सुमारे 607 कोटींचा विकास आराखडा मंजूर करून 31 मार्च 2017 ला जीआर जारी केला. त्यानंतर नियमित स्वरूपात कामे सुरू झाली आहेत. यात पुरातत्त्व खाते, बांधकाम विभाग, पर्यटन विभाग, सांस्कृतिक विभाग, नियोजन विभाग आदी विभाग सक्रिय आहेत. 

केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन खाते; तसेच भारतीय पुरातत्त्व विभाग यांच्यासोबत दिल्ली येथे 2017 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाची बैठक झाली. या बैठकीत रायगड किल्ल्याचा जिर्णोद्धार आणि इतर बांधकामांना मान्यता देण्यात आली. त्यानुसार पुरातत्त्व विभागाशी संबंधित 118 कोटींच्या विकासकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यटन विभागाशी झालेल्या चर्चेत अनेक निर्णयांवर मोहोर उठवण्यात आली. 

यात रायगड किल्ल्याभोवती विशेष तटबंदी करणे, किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी विशेष कौशल्य असणारे कारागीर सार्वजनिक बांधकाम खात्याने उपलब्ध करून देणे; तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यटन विभागाच्या विश्रामगृहाची दुरुस्ती आदींचा समावेश आहे. 

आकडेवारी 
आराखड्यातील कामे व खर्च (रुपयांत) 
- भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत केली जाणारी कामे ः 124 कोटी 14 लाख 
- रायगड किल्ला, पाचाड येथील समाधी, वाडा परिसरातील कामे ः 49 कोटी 52 लाख 
- परिसरातील पर्यटनाशी संबंधित कामे ः 78 कोटी 91 लाख 
- परिसरातील मूलभूत सुविधा (21 गावांचा परिघ) ः 43 कोटी 60 लाख 
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे ः 206 कोटी 4 लाख 
- भूसंपादन ः 25 कोटी 
- रज्जू मार्ग अर्थात रोप वे ः 50 कोटी 
- तातडीचा खर्च ः 28 कोटी 86 लाख 

अनेक कामे प्रगतिपथावर 
पुरातत्त्व विभागाकडून रायगडावर उत्खननाचे दोन महिन्यांपासून उत्खनन सुरू आहे. यात अनेक शिवकालीन अवशेष सापडले. रोप वे अपर स्टेशन ते कुशावर्त तलाव होळीचा माळ या कामाला सुरुवात झाली आहे. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची कामे तीन टप्प्यांत होणार आहेत. दोन टप्प्यातील कामे सुरू करण्यासाठी स्वच्छता करण्यात आली आहे. रायगडावरील पाण्याच्या शिवकालीन टाक्‍यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. 21 टाक्‍या स्वच्छ झाल्यामुळे पुढील वर्षापासून 20 लाख लिटर पाणीसाठा उपलब्ध होईल. जगदिश्‍वर मंदिराची स्वच्छताही पूर्ण झाली आहे. 

निविदा प्रक्रियेत 
अडकलेली कामे 
रायगडावरील पर्यटकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यासाठी पाणीपुरवठा विभागाने जुन्या योजनेच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव पाठवला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेनंतर त्याचे अंदाजपत्रक तयार होईल. रायगडावरील राजसदर, राणीवसा, बुरूज, राजवाडा अशा सर्व प्राचीन वास्तुंच्या संवर्धनाचे 
काम सुरू आहे. पर्यटकांसाठी सुविधा, पोलिस चौकी, निवास व्यवस्था, राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे संवर्धन, पाणीपुरवठा योजना, ध्वनी व प्रकाश योजना, पाचाड येथे शिवसृष्टी, रायगड परिक्रमा मार्ग, रज्जूमार्ग अशी महत्त्वाची कामे आराखड्यात असली, तरी सद्यस्थितीत प्रस्ताव आणि निविदा प्रक्रियेत हा आराखडा अडकला आहे. वेगवेगळ्या सूचनांमुळे आराखड्यातील कामांतही बदल केले जात आहेत. गडावरील ही कामे पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. पुरातत्त्व विभागाची मान्यता आणि इतर परवानग्यांमुळे पहिल्या वर्षी कामे धीम्या गतीनेच सुरू आहेत. 

Web Title: Special fortifications for conservation of Raigad!