वाहतूक सेवेचा वेग मंदावला ; विमान सेवा 40 मिनिटे उशिराने 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

मुसळधार पावसामुळे पाणी साचणारी 19 ठिकाणे मध्य रेल्वेने शोधली आहेत. तिथे पाण्याचा निचरा होण्यासाठी 18 पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे 120 मि.मी. पावसात रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला. 
 

मुंबई : मुसळधार पावसामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीचा वेग मंदावला. विमानांचे उड्डाण आणि लॅण्डिंग 20 ते 40 मिनिटे उशिराने सुरू होते. मध्य रेल्वेवरील सायन, कुर्ला आदी ठिकाणी रुळांवर पाणी साचले होते; तर कांजूरमार्ग परिसरात रुळावर झाड पडल्याने आणि विक्रोळी, घाटकोपरदरम्यान पालिकेच्या भिंतीचा भाग रुळावर कोसळल्याने मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होती. 

कांजूरमार्ग स्थानकात पहाटे रुळावर झाड कोसळले आणि विक्रोळी ते घाटकोपरदरम्यान पहाटे 4 वाजता पालिकेच्या भिंतीचा भाग रुळावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रुळांवर कोसळलेल्या भिंतीच्या मातीचा ढिगारा तत्काळ हटवला; मात्र या घटनेमुळे डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आली होती. तसेच पालिकेला झाड कापण्यासाठी 30 मिनिटांचा ब्लॉक देण्यात आला होता. 

मुसळधार पावसामुळे पाणी साचणारी 19 ठिकाणे मध्य रेल्वेने शोधली आहेत. तिथे पाण्याचा निचरा होण्यासाठी 18 पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे 120 मि.मी. पावसात रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला. 
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डी. के. शर्मा नियंत्रण कक्षात स्वतः आढावा घेत होते. झाड पडल्यामुळे आणि भिंत कोसळल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती; मात्र कोणतीही गाडी रद्द करण्यात आली नाही, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. 

मध्य रेल्वेची खबरदारी 

सलग दोन तास पाऊस सुरू राहिल्यास पादचारी पुलांवरील गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी आरपीएफचे स्थानकांतील प्रभारी तैनात राहतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली. 

Web Title: The speed of the transport service slowed down