‘लोकमान्य गणेशा’च्या माध्यमातून टिळक विचारांचा प्रसार

शर्मिला वाळुंज
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

ठाणे - गणेशोत्सव धूमधडाक्‍यात साजरा करण्याच्या ओघात लोकमान्य टिळक यांच्या मूळ विचारांचा विसर आज नागरिकांना पडत चालला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागची लोकमान्यांची संकल्पना आजच्या पिढीवर पुन्हा बिंबवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी ठाण्यातील हेमंत व्यापारी यांनी ‘लोकमान्य गणेशा’ संकल्पना यंदापासून सुरू केली आहे. त्याअंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

शाडूच्या मातीच्या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करा... घरीच मूर्तीचे विसर्जन करून नंतर ती माती लोकमान्य गणेशाकडे सुपूर्द करा, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषणाला आळा बसून शांततेत उत्सव साजरे होतील व लोकमान्यांचे विचार पुन्हा समाजात रुजले जातील, असा विश्‍वास व्यापारी यांनी व्यक्त केला. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये लोकमान्य गणेशा उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीच्या मूर्तींचे प्रदर्शन १ ऑगस्टपासून सुरू झाले. वकिलीचे शिक्षण घेणारे व्यापारी यांनी प्रदर्शन भरविले असून त्यामागची कल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, की सध्याच्या सण-उत्सवांचे स्वरूप पाहता लोकमान्यांची मूळ संकल्पना विसरून ते धूमधडाक्‍यात साजरे होत आहेत. गणेशाची मोठी मूर्ती वाजतगाजत आणली जाते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण होते. शिवाय विसर्जनादरम्यान जलप्रदूषणही होते. जनजागृती होत असली तरी आपण कमी पडतो, असे कुठेतरी वाटत होते. गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा, असे वाटत असल्याने ‘लोकमान्य गणेशा’ संकल्पना रुजविण्यास सुरुवात केली. ‘मला मान्य’ टॅगलाईनच्या माध्यमातून ती चालविली जात आहे. भक्तांनी शाडूच्या मातीची छोटी मूर्ती घ्यावी. जेणेकरून मूर्तीचे नुकसान होण्याची शक्‍यता कमी असते. शिवाय पर्यावरणास हानीही पोहोचत नाही.

लहान मूर्तींकडे ओढा
उपक्रमातून लहान मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे भक्तांचा ओढा वाढेल. लहान मूर्तींचे आपण घरी विसर्जन करू शकतो. विसर्जन केल्यानंतर ‘लोकमान्य गणेशा’ची टीम तुमच्याकडे येऊन मूर्ती घेऊन जाईल. ठाणे महापालिकेच्या सोबतीने गणेश मूर्तींचे विसर्जन खाडी वा गणेश घाटावर केले जाईल. किमान एक दिवस आधी भक्तांनी ‘लोकमान्य गणेशा’शी संपर्क साधावा, असे आवाहन हेमंत व्यापारी यांनी केले.

Web Title: The spread of Tilak ideas through Ganesha