हत्तीरोगच्या तपासणीसाठी पथक द्वारली गावात दाखल

सुचिता करमरकर
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कल्याण : राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने जेजे हॉस्पिटल मधील एका पथकाने आज कल्याण जवळील द्वारली गावाला भेट दिली. या पथकाने हत्तीरोग लागण होण्याची शक्यता असणाऱ्या सहाही विद्यार्थ्यांची तपासणी केल. तसेच त्यांच्या औषधोपचाराची माहिती करून घेतली. पालिका हद्दीत असूनही पालिकेच्या आरोग्य विभागातील एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या पथकाच्या संपर्कात राहून माहिती घेण्याचे  निर्देश आपण आरोग्य विभागाला दिले असल्याचे पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले. 

 या पथकाने जिल्हा परिषद शाळेत या सहा विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यांना नेमका कोणता त्रास होतोय किंवा त्यांना मागील वर्षभरात कोणत्या प्रकारचे आजार झाले होते याची माहिती घेण्यात आली. या सहापैकी चार विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी हजर होते. क्युलेक्स जातीच्या डासांपासून हत्ती रोगाची लागण होते. त्यामुळे डासांची पैदास होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन या डॉक्टरांनी पालकांना तसेच परिसरातील रहिवाशांना केले. गावातील अस्वच्छता या आजाराचे कारण असू शकते अशी शक्यता या पथकाने व्यक्त केली. मात्र  हत्ती रोगाची लक्षणे अनेकदा काही वर्षांनंतर आढळतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डेंग्यू, मलेरिया या रोगांची लागण ही डासांपासून होते. त्यामुळे घरा सभोवती पाणी साठणार नाही, गटारे वेळच्या वेळी साफ केली जातील तसेच साठवून ठेवलेले पाणी व्यवस्थित झाकून ठेवले जावे अशा सूचना या पथकाने पालकांना दिल्या.
 
या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या डी ई सी या औषधांमुळे यांचा आजार बरा होईल असे आश्वासनही त्यांनी पालकांना दिले. या पथकाद्वारे येत्या दोन दिवसात या सहाही मुलांची पुन्हा रक्त तपासणी केली जाईल. त्यानंतरच पथकाकडून राज्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला जाईल. या अहवालातील निष्कर्षानुसार राज्य सरकार, जिल्हा आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने या परिसरातील मोहिमेची आखणी केली जाईल. हा परिसर कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात अंतर्भूत आहे. शाळा आणि आरोग्य विभाग मात्र ठाणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या पथकाच्या संपर्कात राहून माहिती घ्यावी असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले होते. परंतु या पथकाच्या पाहणीदरम्यान पालिकेच्या आरोग्य विभागातील एकही अधिकारी वा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हते. 

जिल्हा परिषदेच्या शाळेत 170 विद्यार्थी आहेत पहिली ते पाचवीपर्यंत ही शाळा चालते शाळेत मुख्याध्यापकांसह सात शिक्षक आहेत हत्तीरोग निर्मूलन मोहिमेत शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते यातील सहा विद्यार्थ्यांना या रोगाची लागण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: The squad for the examination of elephantitis is in the village of dvarali