दहावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

तीन विषयांच्या परीक्षा दिवसाआड

तीन विषयांच्या परीक्षा दिवसाआड
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या मार्च 2017 मधील दहावीच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. तीन विषयांच्या परीक्षा सलग न घेता, एक दिवसाआड घेतल्या जातील. या निर्णयामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वेळापत्रकात बदल करण्याची मागणी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली होती.

विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण येऊ नये, यासाठी काही वर्षांपासून सलग परीक्षा न घेता एक किंवा दोन दिवसाआड एका विषयाची परीक्षा घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासालाही वेळ मिळतो; परंतु मार्च 2017 मधील परीक्षेत 20 मार्चला विज्ञान, 21 मार्चला सामाजिक शास्त्र-1, 22 मार्चला सामाजिक शास्त्र-2 अशी सलग तीन विषयांची परीक्षा होती. त्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड दडपण होते. वेळापत्रकात बदल करण्याची मागणी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष बोरनारे यांनी केली होती.

या वेळापत्रकाबाबत विद्यार्थीही नाराज होते. पालकांनीही वेळापत्रक बदलण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने हे बदल केले आहेत. शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी एक दिवसाआड परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: ssc exam time table changes