एसटी अपघातात चालकासह १५ प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

चार दिवसांपूर्वीची अक्कलकोट महाड बस अपघाताची घटना ताजी असतानाच कशेडी घाटातील भोगाव धामनदेवी गावाच्या दरम्यान एसटीने टॅंकरला धडक दिली.

पोलादपूर (बातमीदार) : चार दिवसांपूर्वीची अक्कलकोट महाड बस अपघाताची घटना ताजी असतानाच कशेडी घाटातील भोगाव धामनदेवी गावाच्या दरम्यान एसटीने टॅंकरला धडक दिली. या धडकेत बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडला असून, जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिपळूणकडून परळकडे जाणारी एसटी पोलादपूर हद्दीतील कशेडी घाट मार्गावर भोगाव ते धामनदेवी दरम्यान येताच चालक राहुल मांढरे याला बसवर नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी, बसची समोर जाणार्!या टॅंकरला धडक बसली. यात १४ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना कशेडी टॅपचे सहायक फौजदार यशवंत बोडकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चालकासह प्रवाशांना रुग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे पीएसआय खिरड, पोलिस हवालदार सुवर्णा खाडे, शिरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलादपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Accident in kashedi Ghat