एसटीची 30 रुपयांत चहा-नाश्‍ता योजना फसली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

अधिकृत थांब्यांकडून एसटीला उत्पन्न
साधी बस : 141 रुपये
शिवशाही : 242 रुपये
हिरकणी निमआराम : 182 रुपये

मुंबई - राज्यातील 50 अधिकृत थांब्यांवरील हॉटेलांत प्रवाशांनी तिकीट दाखवल्यास 30 रुपयांत चहा-नाश्‍ता देण्याची एसटी महामंडळाची योजना आहे; परंतु त्याबाबतच्या परिपत्रकात नाश्‍त्याची वेळ आणि प्रमाण याचा उल्लेखच नाही. त्यामुळे हॉटेलचालक आणि प्रवाशांमध्ये वाद होत आहेत. प्रवाशांना या योजनेचा लाभ होत नसल्यामुळे तक्रारींत वाढ झाली आहे.

खासगी वाहतुकीच्या तुलनेत प्रवाशांना चांगल्या सोई-सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने 30 रुपयांत चहा-नाश्‍त्याची योजना सुरू केली आहे. त्यासाठी महामंडळाने राज्यात 50 अधिकृत थांबे निवडले आहेत. तेथील हॉटेलांत तिकीट दाखवल्यानंतर एसटी प्रवाशांना प्रसाधनगृहाची सोय आणि अल्प दरात चहा-नाश्‍ता मिळणे अपेक्षित आहे. तथापि, एसटीने 2016 मध्ये काढलेल्या परिपत्रकात चहा-नाश्‍त्याची वेळ आणि प्रमाण याचा उल्लेख नाही. त्यामुळे बहुतेक अधिकृत थांब्यांवरील हॉटेलांत प्रवाशांना चहा-नाश्‍त्याची सुविधा मिळत नसल्याचे आढळले. काही ठिकाणी ही सुविधा प्रवाशांना मिळत असली तरी, चहा-नाश्‍त्याचे प्रमाण एसटीने स्पष्ट केले नसल्याबद्दल प्रवाशांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.

Web Title: ST Breakfast Scheme Fail