एसटी बसच्या अपघातांत घट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

एसटी बसच्या अपघातांमध्ये पाच वर्षांत घट झाली असून, शून्य अपघातासाठी प्रयत्न केले जातील, असे महामंडळातर्फे सांगण्यात आले. अपघात कमी व्हावेत, यासाठी राबविलेल्या मोहिमांबद्दल प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

मुंबई - एसटी बसच्या अपघातांमध्ये पाच वर्षांत घट झाली असून, शून्य अपघातासाठी प्रयत्न केले जातील, असे महामंडळातर्फे सांगण्यात आले. अपघात कमी व्हावेत, यासाठी राबविलेल्या मोहिमांबद्दल प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

एसटी बसच्या अपघातांची संख्या २०१३-१४ मध्ये ३०७८ होती. ही संख्या २०१७-१८ मध्ये २०३२ एवढी कमी झाली. या काळात अपघातांमध्ये एक हजाराने घट झाल्यामुळे एसटी प्रवास सुरक्षित होत असल्याचे दिसत आहे. सुरक्षित प्रवासासाठी नागरिक एसटीला प्राधान्य देतात. मात्र, अपघातांमुळे काही काळात सामान्य प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली होती. शिवशाही, साध्या बसच्या दररोज होणाऱ्या अपघातांमुळे प्रवास असुरक्षित होत असल्याचे दिसत होते.

हे चित्र बदलण्यासाठी एसटी महामंडळाने राज्यभर सुरक्षितता मोहीम राबविली. त्यामध्ये चालकांना प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन आदी उपायांचा समावेश होता. चालकांना सुरक्षित प्रवासासाठी प्रोत्साहनपर बक्षीस, प्रमाणपत्र आणि सुरक्षित सेवेचे पदक देऊन सन्मानित करणात आले. त्यामुळे एसटी सेवा आणखी सुरक्षित झाल्याने प्रवाशांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. अपघात शून्यावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, असे सांगण्यात आले.

Web Title: ST Bus Accident Percentage Less