वाडा-अघई महामार्गावर एसटी बसला अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

52 विद्यार्थ्यांसह 5 जण जखमी; दोन गंभीर

मुंबई : वाडा-अघई महामार्गावरील जांभुळपाडा येथे मंगळवारी सकाळी बस नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात 52 विद्यार्थांसह 5 प्रवासी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

वाडा आगाराची वाडा-पिवळी बस (एम.एच.14 बीटी 2331) सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पिवळीहून वाड्याकडे येत असताना जांभुळपाडा येथील गतिरोधकावर चालक काशिनाथ जाधव याने जोराने ब्रेक लावला. त्याच वेळी त्याचा बसवरील ताबा सुटून बस विरुद्ध दिशेला जाऊन थेट रस्त्याजवळील नाल्यात गेली.

या बसमध्ये स्वामी विवेकानंद विद्यालयाचे 34 विद्यार्थी; तर पी. जे. हायस्कूलचे 18 विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांना हाता-पायाला, तोंडावर किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. अपघातातील 57 प्रवाशांना वाडा येथील ग्रामीण व खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; तर त्यापैकी राम नवमी प्रसाद (50) व सुमन प्रसाद (38) यांच्या हातापायाला फ्रॅक्‍चर झाल्याने परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मदतीसाठी स्थानिक नागरिक धावले
अपघाताची माहिती मिळताच पालक व आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी जाऊन मिळेल त्या वाहनाने अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहचवले. त्यानंतर वाडा आगारातून एक बस पाठवून अपघातग्रस्तांना रुग्णालयात आणण्यात आले. शिवसेनेचे नेते तथा पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, वाड्याच्या सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील, नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर, शिवसेनेचे वाडा शहर प्रमुख नरेश चौधरी, नगरसेविका नयना चौधरी, भाजपचे युवा नेते रोहन पाटील, कुणाल साळवी, युवा सेनेचे तालुका अधिकारी नीलेश पाटील, तालुका सचिव नीलेश पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस केली. या वेळी वाड्याचे गटशिक्षणाधिकारी जयवंत खोत, स्वामी विवेकानंद व पी. जे. हायस्कूलचे मुख्याध्यापक रुग्णालयात हजर होते.

"एसटी'कडून जखमींना तातडीची मदत 
अपघातग्रस्तांना तातडीची मदत म्हणून एक हजाराची तात्काळ मदत करण्यात आल्याची माहिती वाडा आगाराचे प्रमुख मधुकर धांगडा यांनी दिली. अपघातास कारणीभूत बसचालक काशिनाथ जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचेही धांगडा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus accident on Wada-Aghai highway