मुंब्रा बायपास बंदमुळे एसटीला लेटमार्क 

ST Bus late due to mumbra bypass closed
ST Bus late due to mumbra bypass closed

ठाणे - मुंब्रा बायपास मार्ग दुरुस्तीच्या कारणांमुळे दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आल्याने याचा फटका आता एसटी प्रशासन आणि प्रवाशांना बसण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील ठिकठिकाणच्या वाहतूक कोंडीमुळे एसटी बस तब्बल अर्धा ते दीड तास अडकून पडत असल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांनी गाडीत बसूनच वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहिली, तर वाहतूक कोंडीत फसलेल्या एसटीचे इंधनही जळत असल्याने एसटी महामंडळालाही याचा चांगलाच भुर्दंड बसण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे नवी मुंबईत इतर दिवशी बाय रोड जाणाऱ्या चाकरमान्यांनी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गाचा पर्याय निवडला. 

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी काही पर्यायी मार्ग ठरविण्यात आले आहेत. बायपास बंद झाल्यामुळे; तसेच अनेकांना याबाबत पुरेशी कल्पना नसल्याने पर्यायी मार्गावर सकाळी आणि रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र, ज्या पर्यायी मार्गावरून ही वाहतूक वळविण्यात आली आहे. त्या मार्गावरून एसटी बसगाड्याही मोठ्या प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे भिवंडी, नवी मुंबई, मुंबई या मार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटी बस गाड्यांना अर्धा ते दीड तासापर्यंत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. एसटी परिवहन सेवाचा वापर सर्वांत जास्त ग्रामीण भागातील नागरिक करतात. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास या ग्रामीण भागातील नागरिकांनाही बसला. मंगळवारी भिवंडीहून लता भोईर या एसटीने ठाण्याच्या दिशेने येत होत्या; मात्र वाहतूक कोंडीमुळे रात्री उशीर झाल्याने चांगलाच मनस्ताप झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रसिका सांबरे यांनाही नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने यायचे होते. यासाठी सकाळी त्यांनी एसटी पकडली; मात्र कळवा नाका येथे त्या वाहतूक कोंडीत अडकल्या. कळवा ब्रीजवर दोन्हीकडून वाहनांचे हॉर्न आणि प्रदूषण यामुळे मोठा त्रास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. एसटीप्रमाणेच टीएमटीच्या बसनाही याचा फटका बसला. टीएमटीच्या गाड्याही काही काळ उशिराने धावत असल्याची माहिती टीएमटीचे परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी सांगितले. यासंबंधी ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधला; मात्र तो होऊ शकला नाही. 

ट्रान्स हार्बरवर गर्दी 
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक चाकरमान्यांनी ट्रान्स हार्बर रेल्वेचा पर्याय निवडला. नवी मुंबईतील कंपन्यांच्या अनेक गाड्या ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने कर्मचाऱ्यांना घेऊन जात असतात. सकाळी कळवा पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने अनेकांनी वेळेत पोहचावे यासाठी रेल्वेचा पर्याय निवडल्याचे दिसून आले. 

मुंब्रा बायपास बंदचा फटका एसटी बसनाही बसला. रात्री आणि सकाळच्या वेळेत अनेक गाड्या अर्धा तासापेक्षाही जास्त उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास जाणवला; मात्र आम्ही एकही बस रद्द केली नाही. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून वाहतूक कोंडीत अडकलेल्या गाड्या येण्याची वाट न पाहता दुसऱ्या एसटी गाड्यांमधून प्रवाशांची सोय केली. 
- शैलेश चव्हाण, वाहतूक नियंत्रक अधिकारी, ठाणे विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com