एसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट

प्रशांत कांबळे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले आक्षेप डावलून ८८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले; मात्र तीन महिन्यांत काम सुरू झालेले नाही.

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले आक्षेप डावलून ८८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले; मात्र तीन महिन्यांत काम सुरू झालेले नाही.

एसटी महामंडळाने निश्‍चित केलेल्या या कंत्राटावर दक्षता विभागाने आक्षेप घेतले. दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले होते. या कामाच्या फायद्या-तोट्याचा अहवाल नसल्याने भ्रष्टाचार होऊ शकतो, अशी नोंद दक्षता विभागाने केली होती. निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दर दिल्याचे सांगत रोल्टा इंडिया या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. या प्रक्रियेत काही नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचा आक्षेपही दक्षता विभागाने घेतला होता.

दक्षता विभागाने प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर एसटी महामंडळाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांनी ही निविदा थेट परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवली. त्यात दक्षता विभागाने विचारलेल्या प्रश्‍नांचा उल्लेख टाळण्यात आला होता, असे समजते. 

अधिकारी, मंत्र्यांमध्ये संभ्रम
अद्याप कंपनीने काम सुरू न केल्याने कंपनीवर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी सांगितले आहे; तर या कंपनीकडून काम व्यवस्थित सुरू असल्याचे एसटी महामंडळाचे संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत मला काहीच कल्पना नसून, धोरणात्मक निर्णय फक्त आपल्याकडे असल्याचे सांगितले. यामुळे अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये याबाबत संभ्रम असल्याचे समोर आले आहे.

दक्षता विभागाचे आक्षेप
     व्यवहार्यता अहवाल नाही.
     मनुष्यबळाच्या बचतीबाबत माहितीचा अभाव. 
     वार्षिक बचतीचा अंदाज नाही.

Web Title: ST Computer Contract