एसटी प्रवास महागणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने एसटी महामंडळ तिकीट भाडेवाढ करण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई - डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने एसटी महामंडळ तिकीट भाडेवाढ करण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षी मे महिन्यात एसटी महामंडळाला 58.02 रुपये लिटर या दराने डिझेल मिळत होते. आता एक लिटर डिझेलसाठी 68.39 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे महामंडळाला प्रतिलिटर डिझेलमागे 10.38 पैसे अधिक मोजावे लागत आहेत. दोन हजार 300 कोटी रुपयांचा संचित तोटा सोसणाऱ्या महामंडळाला या वर्षी केवळ इंधन दरवाढीमुळे 460 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

सहा महिन्यांपासून सातत्याने डिझेल दरवाढ होत असतानाही प्रवाशांना झळ बसू नये, या उद्देशाने महामंडळाने तिकीट भाडेवाढ करणे टाळले होते. यापूर्वी ऑगस्ट 2014 मध्ये एसटीची तिकीट भाडेवाढ झाली होती. मात्र, सातत्याने होणारी डिझेल दरवाढ कुठे थांबेल, हे निश्‍चित नसल्याने नाईलाजास्तव तिकीट भाडेवाढ करणे अपरिहार्य बनले आहे. सर्व घटकांचा विचार करून महामंडळ आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: ST Journey Expensive