एसटीने गमावला भूखंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

ठाणे - पालिकेने एसटी महामंडळासाठी राखीव ठेवलेला भूखंड वेळेत ताब्यात घेतला नाही. याचा फटका महामंडळाला बसला आहे. ही जागा पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तिथे अवजड वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचा पालिकेचा मानस आहे. या जागेवरील आरक्षण बदलाचा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवला जाणार आहे. 

ठाणे - पालिकेने एसटी महामंडळासाठी राखीव ठेवलेला भूखंड वेळेत ताब्यात घेतला नाही. याचा फटका महामंडळाला बसला आहे. ही जागा पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तिथे अवजड वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचा पालिकेचा मानस आहे. या जागेवरील आरक्षण बदलाचा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवला जाणार आहे. 

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे; परंतु पालिकेच्या पार्किंग धोरणाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शहरातील पार्किंगला शिस्त नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. एसटी महामंडळाचे खोपट, कळवा येथे वर्कशॉप आहे. खोपट येथील वर्कशॉपच्या जागेचे बीओटी तत्त्वावर पुनर्निर्माण करण्यात आले आहे. भूखंडाच्या क्षेत्रफळापैकी काही भागावर वाणिज्य वापराची परवानगी देऊन वर्कशॉपची जागा कमी करण्यात आली आहे. याचाच अर्थ एसटी महामंडळाकडे ठाण्यात पुरेशी जागा आहे, अशी भूमिका पालिकेने घेतली आहे. एसटी महामंडळाने बाळकुम येथील सव्वादोन हेक्‍टरचा राखीव भूखंड अद्याप ताब्यात घेतलेला नाही. शिवाय नौपाडा येथील भूखंड याच पद्धतीने महामंडळाने ताब्यात घेतलेला नाही. अशावेळी एसटीला या जागेची गरज नसल्यास त्यावर पालिकेने नागरिकांसाठी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरात ट्रक, टेम्पो, बस आदी अवजड वाहनांना अनेक कामांसाठी प्रवेश द्यावा लागतो. या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ते रस्त्याच्या कडेला असलेली जागा व्यापतात. त्यामुळे काही भागांत वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने बाळकुम आणि नौपाडा भागातील एसटीच्या आरक्षित भूखंडावर अवजड वाहनांचे पार्किंग असा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरबदलाचा प्रस्ताव आणताना पालिकेने सूचना, हरकती मागवल्या होत्या. 18 हरकती दाखल झाल्या होत्या; परंतु त्यानंतर 15 दिवसांत लेखी हरकत घेतली न गेल्याने त्या फेटाळण्यात आल्या आहेत. एसटीने म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. पालिकेने 15 दिवसांचा अवधी दिला. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

Web Title: ST lose the plot