एसटी होणार 'पोलादी'!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

लवकरच नव्या बांधणीच्या "परिवर्तन' बस

लवकरच नव्या बांधणीच्या "परिवर्तन' बस
मुंबई - अपघातात जीवितहानी किंवा प्रवाशांना गंभीर दुखापत होऊ नये, यासाठी "परिवर्तन' बसमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. ऍल्युमिनियमऐवजी पोलादाचा (स्टील) वापर करून या बसची बांधणी केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर एसटीच्या दापोडी येथील केंद्रीय कार्यशाळेत अशी एक बस तयार करण्यात आली आहे. ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती महामंडळाने दिली.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात पूर्वीपासून लाल रंगाच्या बस होत्या. प्रवाशांचा खासगी वाहनांकडे कल वाढल्याने एसटी तोट्यात जाऊ लागली. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतींच्या योजनांसह एसटीने कात टाकत बसच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये "परिवर्तन' बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या.

दरवर्षी एसटीच्या कार्यशाळेत नव्या बस तयार होतात. मात्र, आतापर्यंत तयार झालेल्या सर्व बस ऍल्युमिनिअमच्या आहेत. त्या वजनाने हलक्‍या असल्या तरी अपघातावेळी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी नव्याने बस बनवण्यासाठी ऍल्युमिनिअमऐवजी पोलाद वापरण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एक पोलादी बस तयार झाली आहे. प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी या बसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

नव्या बसची उंची जुन्या बसपेक्षा 30 से.मी. ने अधिक असेल. प्रवाशांचे साहित्य ठेवण्याच्या जागेत तिपटीने वाढ करण्यात आली आहे. आरामदायक प्रवासासाठी या बसच्या खिडक्‍यांचा आकारही मोठा असेल. बसच्या सांध्यात थरमाकोलचा वापर करण्यात आल्याने प्रवासावेळी बसचा आवाज होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अशी असेल नवी बस...
- बसमध्ये एलईडी मार्गफलक
- उद्‌घोषणा यंत्रणेद्वारे बसथांब्याची सूचना
- हवा खेळती राहण्यासाठी छताला तीन रूफ हॅच
- दुर्घटनेवेळी सूचना देण्यासाठी अलार्म सुविधा

Web Title: st make in steel