एसटीच्या ‘शिवशाही’ला अपघातांचा विळखा

Shivshahi
Shivshahi

मुंबई - जून २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या काळात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे ५२२ अपघात झाले. या अपघातग्रस्त वाहनांत महामंडळाच्या मालकीच्या ३०८; तर भाडेतत्त्वावर घेतलेल्या २१४ बसचा समावेश होता. म्हणजे एसटी महामंडळाच्या मालकीच्या शिवशाहीला अपघात होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे.

प्रवाशांच्या सोईसाठी एसटी महामंडळाने शिवशाही सेवा सुरू केली. या सेवेंतर्गत एसटी महामंडळाकडे मालकी असलेल्या ५०० आणि खासगी वाहतूकदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या ५२३ अशा एकूण १०२३ बसगाड्या चालवल्या जातात. अनेक मार्गांवरील साध्या एसटी बंद करून शिवशाही बस सुरू करण्यात आल्या, परंतु शिवशाही सेवेतील बसगाड्यांच्या अपघातांची मालिकाच सुरू झाली. त्यात भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या तुलनेत महामंडळाच्या मालकीच्या वाहनांचे अपघात जास्त असल्याचे उघड झाले आहे.

शिवशाही बसगाड्यांचे अपघात कमी करण्यासाठी खासगी आणि महामंडळाच्या चालकांना प्रशिक्षण देण्यात आले, परंतु त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे प्रवाशांनी शिवशाही सेवेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी काही मार्गांवरील शिवशाही बसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात एसटीची शिवशाही सेवा तोट्यात जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

‘शिवशाही’बाबतचे प्रश्‍न त्वरित सोडवण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश 
एसटी फायद्यात आणायची असेल, तर प्रवासी संख्येत वाढायला हवी. त्यासाठी चालक-वाहकांनी प्रवाशांशी सौजन्याने वागायले हवे, असे आवाहन करत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सवलत योजनांचा पाढा वाचला. या वेळी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचे व्हिडीओदेखील त्यांनी दाखवले.

शिवशाही वाहनांच्या वाढत्या अपघातावरसुद्धा रावते यांनी चिंता व्यक्त केली. बैठकीला उपस्थित चालक-वाहकांचे शिवशाहीसंदर्भात असलेले प्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्याचे आदेशसुद्धा या वेळी रावते यांनी दिले. 
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृहावर परिवहन मंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये एसटीच्या १३ संघटनांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांबद्दल रावते यांनी माहिती दिली. एसटीचे भारमान वाढवण्यासाठी अधिक काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा प्रवासी आणि चालक-वाहकांमध्ये होणाऱ्या संघर्षाचे व्हिडीओसुद्धा दाखवण्यात आल्याचे चालक-वाहकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com