एवढं करुनही 'एसटी' कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे एसटीचे कर्मचारी अद्याप पगार न झाल्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

मुंबई : राज्य सरकारने प्रलंबित सवलत मूल्याचे सुमारे 250 कोटी रुपये एसटी महामंडळाला 14 मे रोजीच दिले आहेत. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांचा एप्रिलचा पगार अद्याप झालेला नाही. अशा परिस्थितीत शुक्रवारपासून (ता. 22) जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू होणार आहे. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे एसटीचे कर्मचारी अद्याप पगार न झाल्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा : एकीकडे कोरोनाची लढाई, दुरीकडे भाजपचे ‘टार्गेट उद्धव ठाकरे’; असं आहे भाजपचं नियोजन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी बस सेवा बंद असून, फक्त मुंबईतील अत्यावश्यक सेवा सुरू आहे. राज्यात अडकलेले परप्रांतीय आणि सीमेवर आलेल्या राज्यातील मजुरांना मोफत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. मे महिना संपत आला, तरी एप्रिलचा पगार झाला नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्य सरकारने दिलेल्या 250 कोटी रुपयांतून कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार दिला, तरी मे महिन्याच्या पगाराचा प्रश्न एसटी महामंडळापुढे कायम राहणार आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटी कर्मचारी कोरोनाची बाधा होण्याची भीती असूनही परिवारापासून दूर राहून अत्यावश्यक सेवा देत आहेत. कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असल्याने एसटी महामंडळाने पगार दिल्यास आर्थिक अडचणी दूर होतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा : अतिहुशारपणाचा कळस ! सोसायटीत रंगली चक्क 'समोसा' पार्टी, मग पोलिसांनी....

एसटी कर्मचाऱ्यांना पगार द्यावाच लागणार असून, त्यासाठी काम सुरू आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत पगाराच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.
- ॲड्. अनिल परब, परिवहन मंत्री

सरकाकडून 250 कोटी रुपये मंजूर होऊन आठ दिवस उलटून गेले, तरी वेतनाचे अंतिम आदेश अद्याप दिलेले नाहीत. जिवाची जोखीम घेऊन एसटी कर्मचारी काम करत आहेत. प्रशासनाने सर्वांना संपूर्ण पगार देण्याचे परिपत्रक काढले आहे. वेतन देयके तयार आहेत. शनिवारपासून तीन दिवस बॅंका बंद राहतील. रमजान ईदचा सण आहे. कामगारांचा रोष वाढत असल्याने लवकर पगार द्यावा.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

ST staff Waiting for  salary, read detail story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST staff Waiting for salary, read detail story