स्थायी समिती अध्यक्षपदासाठी कोरगावकर यांची उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे रमेश कोरगावकर; तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी शुभदा गुडेकर यांनी शुक्रवारी (ता.10) उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समितीच्या 14 मार्चला होणाऱ्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात येईल.

मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे रमेश कोरगावकर; तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी शुभदा गुडेकर यांनी शुक्रवारी (ता.10) उमेदवारी अर्ज भरले. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थायी समितीच्या 14 मार्चला होणाऱ्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात येईल.

महापालिकेचा आर्थिक कारभार स्थायी समितीवर अवलंबून आहे. त्यामुळे तिच्या अध्यक्षपदासाठी चुरस होती. भाजपने कोणत्याही पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर आणि रमेश कोरगावकर यांच्यात स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस होती; परंतु चेंबूरकर आणि सातमकर यांच्याऐवजी ऐनवेळी कोरगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवसभरात प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज दाखल न झाल्याने कोरगावकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरगावकर चौथ्यांदा नगरसेवक झाले आहेत. त्यांना स्थायी समितीच्या कामकाजाचा अनुभव आहे.

शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी गुडेकर आणि शीतल म्हात्रे यांच्यात रस्सीखेच होती; परंतु "मातोश्री'ने गुडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गुडेकर यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याविरोधातही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. गुडेकर यांनी आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाचीही धुरा सांभाळली आहे.

मंगेश सातमकर नाराज
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी सातमकर आणि कोरगावकर यांनाही पालिका मुख्यालयात बोलावले होते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावाला "मातोश्री'ची पसंती मिळते, याविषयी उत्सुकता होती. अखेर शेवटच्या क्षणी "मातोश्री'वरून आदेश आला आणि कोरगावकर यांनी अर्ज भरला. त्यामुळे नाराज झालेले सातमकर पालिकेतून निघून गेले. सातमकर आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह पालिकेत आले होते. महापौरपदासाठीही सातमकर यांचे नाव चर्चेत होते, पण त्याही पदाने त्यांना हुलकावणी दिली. स्थायी समितीचे अध्यक्षपद तरी आपल्याला मिळेल, या आशेवर सातमकर होते.

Web Title: standing committee chairman ramesh korgavkar