स्थायी समितीत खांदेपालट!
नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा लौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी म्हणजेच स्थायी समितीचे सभापतिपद आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी पुन्हा नवीन आठ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. या निवडणुकीत सभापतिपद आपल्याच पक्षाला मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यात काँग्रेसचे निर्णायक मत पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसची नगरसेविका मीरा पाटील यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीला मनधरणी करावी लागणार आहे.

एप्रिलच्या शेवटी स्थायी समितीची मुदत संपत असल्याने १८ एप्रिलच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांच्या निवृत्तीचा प्रस्ताव पटलावर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे जयवंत सुतार, प्रकाश मोरे, विनोद म्हात्रे; तर शिवसेनेतून सभापती शिवराम पाटील, मनोहर मढवी, भारती कोळी, काशिनाथ पवार व जगदीश गवते हे आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी पुन्हा नवे आठ सदस्य निवडून देऊन नंतर सभापतींची निवड करण्यात येणार आहे. स्थायी समितीची तिजोरी आपल्याकडे यावी यासाठी आघाडी व युतीमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. यात शिवसेनेकडून दिग्गजांची नावे समोर येत असल्याने स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. गेल्या वर्षी भाजपच्या मदतीने काँग्रेसच्या नगरसेविका मीरा पाटील यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला दिलेल्या दगाफटक्यामुळे राष्ट्रवादीला स्थायी समितीचे सभापतिपद गमवावे लागले होते. त्यामुळे या वेळी राष्ट्रवादीला सभापतिपदासाठी एक मत कमी पडत असल्याने पुन्हा काँग्रेसला गळ घालावी लागणार आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या मर्जीतील मीरा पाटील यांचे मत यात महत्त्वाचे आहे, परंतु त्यांनी मागच्याप्रमाणे पुन्हा शिवसेनेला मदत केल्यास या वेळीही राष्ट्रवादीच्या हातातून स्थायी समिती जाण्याची शक्यता आहे.
...तर भवितव्य चिठ्ठीत
स्थायी समितीमध्ये महापालिकेच्या एकूण पक्षीय बलाच्या माध्यमातून राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व भाजप या चार पक्षांचे एकूण १६ सदस्य आहेत. यात राष्ट्रवादीचे आठ, शिवसेना सहा; तर भाजप व काँग्रेसचा अनुक्रमे एक सदस्य आहे. शिवसेना-भाजप मिळून आठ सदस्यसंख्या होते; तर राष्ट्रवादीकडेही ८ सदस्य आहेत. त्यामुळे मतदान बरोबरीत झाल्यास निवडणूक निर्णाय अधिकाऱ्याकडून चिठ्ठी काढली जाऊ शकते.